नांदेड(प्रतिनिधी)-1 जून रोजी खुराणा ट्रव्हल्सजवळून कंधारचे जिल्हा न्यायाधीश अभिताब पाचभाई यांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला वजिराबाद पोलीसांनी पकडले आहे. मोबाईल जप्त केला आहे. तसेच 7 जून रोजी रेल्वे स्थानक ते बसस्थानक जाणाऱ्या सासु आणि सुनबाईला लुटणाऱ्या दोन चोरट्यांना वजिराबाद पोलीसांनी अटक केली आहे. दोन्ही प्रकरणातील 100 टक्के ऐवज जप्त केला आहे.
दि.1 जून रोजी कंधार येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश अमिताभ पाचभाई हे रात्री 9 वाजेच्यासुमारास खुराणा ट्रव्हल्ससमोर मोबाईलवर बोलत असतांना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला होता. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी शहिदपुरा भागातील साईनाथ दिगंबर हंबर्डे (28)रा.बिजेगाव ता.उमरी ह.मु.शहिदपुरा नांदेड यास पकडले आणि जिल्हा न्यायाधीश पाचभाई यांचा मोबाईल जप्त केला. तसेच गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी गाडी पण जप्त केली.
दुसऱ्या एका घटनेत 7 जून रोजी सुर्यश्री काटमवार आणि त्यांच्या सासुबाई पहाटे 5 वाजेच्यासुमारास बसस्थानक ते रेल्वे स्थानकाकडे जात होत्या. कारण त्या निजामाबाद येथून लग्नातून आल्या होत्या आणि त्यांना आपल्या गावी हिंगोली येथे जायचे होते. दोन चोरट्यांनी त्यांना धाक दाखवून त्यांच्या पर्समधील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनीमंगळसुत्र तीन तोळे वजनाचे, 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मनीमंगळसुत्र 2.5 तोळ्याचे आणि 5 तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या 2 लाख रुपये किंमतीच्या आणि दोन मोबाईल बळजबरीने चोरून नेले होते. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी सय्यद बिलाल सय्यद फय्याज (19) रा.वाघीरोड टेकडा यास पकडले. त्याच्याकडून सुयश्री काटमवार यांचा 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्हा करतांना वापरलेली 50 हजार रुपयांची दुचाकी जप्त केली आहे.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी या दोन कामगिरीसाठी वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, प्रशांत लोंढे, पोलीस अंमलदार शिवसांब मठपती, शेख इमरान, ज्वालासिंग बावरी, रमेश सुर्यवंशी, राठोड, पोकले, दंगुलवार तसेच सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक मारोती चव्हाण आणि पोलीस अंमलदार दिपक ओढणे यांचे कौतुक केले आहे. महिलांना लुटणाऱ्या लोकांपैकी शाहेद मटके हा अद्याप पोलीसांच्या ताब्यात आला नाही.
कंधारच्या जिल्हा न्यायाधीशांचा मोबाईल पोलीसांनी शोधला; सासु सुनेला लुटणारा एक चोरटा गजाआड वजिराबाद पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी
