नांदेड (प्रतिनिधी)- रस्ते अपघातांतील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या उद्देशाने झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट उपक्रमांतर्गत मंगळवारी नांदेड येथील नियोजन भवनात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यशाळेस पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक रुपाली देवरेकर-मुंडे, ,परभणीचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सेफ लाईफ फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी रस्ते सुरक्षा, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, अपघात विश्लेषण आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुरक्षित वाहतूक व्यवस्था बळकट करणे आणि रस्ते अपघातांतील मृत्यूदर टप्प्याटप्प्याने कमी करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.



