नांदेड(प्रतिनिधी)-11 मे रोजी वसरणी भागातील पाण्याच्या टाकीजवळ झालेला खून आणि जिवघेणा हल्ला या प्रकरणातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच गुन्हेगारांना नांदेड ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या मेहनत घेवून पकडल्यानंतर न्यायालयाने यातील चार आरोपींना सहा दिवस पोलीस कोठडीत पाठविल्या संदर्भाची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने प्रेसनोटच्या माध्यमाने प्रसिध्दीसाठी पाठविली आहे.
दि.11 मे रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास वसरणी भागात गोळीबार झाला. त्यात शेख परवेज हा युवक मरण पावला आणि तेजासिंग राजेंद्रसिंग बावरी या युवक जखमी झाला. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 450/2025 दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील हल्लेखोर आणि मारेकरी शोधण्यासाठी 6 वेगवेगळ्या पथकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे दमदार पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात नामांकित असलेले पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, बाबूराव चव्हाण, व्यंकट कुसमे आणि सायबर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार दिपक ओढणे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदारांनी मेहनत घेवून नांदेड जिल्ह्याबाहेर शोध घेवून पाच गुन्हेगारांना पकडले. त्यांची नावे सिध्देश्र्वर उर्फ पवन सुदाम पुयड (20) रा.पुणेगाव, विशाल विष्णु मोरे (21) रा.व्यंकटेशनगर नांदेड, ओमकांत उर्फ सोन्या मारोती मोरे (19) रा.शंकरनगर वसरणी, दत्ता लक्ष्णम मोरे (26) रा.वसरणी जि.नांदेड तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय कांबळे हे करीत आहेत. आज दि.17 मे रोजी पकडलेल्या पाच गुन्हेगारांपैकी चौघांना न्यायालयाने सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी या पथकांचे कौतुक केले आहे.
संबंधीत बातमी….