*२२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा*
नांदेड : -भोकर मतदार संघातील युवकांसाठी श्रीजया चव्हाण यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. युवा उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन युवकांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित युवा उमेदवार नावाच्या फेसबुक पेजच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलवार,आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार झाल्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी पहिल्याच महिन्यात त्या कामाला लागल्या असून, त्यांच्या ‘युवा उमेद’ उपक्रमातून युवकांना रोजगाराची संधी चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री ना अतुल सावे यांनी व्यक्त केली. रोजगार व स्वयंरोजगार तसेच शैक्षणिक दर्जोन्नतीसाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी सुरु केलेल्या ‘युवा उमेद’ उपक्रमाचे फेसबुक पेज व इन्स्टाग्रामचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
‘युवा उमेद’च्या वतीने शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा आणि मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे विमोचन देखील पालकमंत्री व इतर मान्यवरांनी याप्रसंगी केले. मराठवाड्यात अनेक उद्योग येत असून, ती संधी साधण्यासाठी आपल्या भागातील तरुणांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या ओबीसी विकास खात्यांतर्गत असलेली संस्था ‘महाज्योती’चा स्टॉल अर्धापूरच्या रोजगार मेळाव्यात उपलब्ध असेल, असेही त्यांनी आवर्जून घोषित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली. मराठवाड्यासारख्या भागात देखील ही गुंतवणूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे खा. अशोकराव चव्हाण या कार्यक्रमात म्हणाले. आ. श्रीजया चव्हाण यांनी रोजगार मेळावा तर आयोजित केलाच आहे; सोबतच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखत कशी होते, तिथे कसे बोलायचे, कसे कपडे घालायचे, आदींबाबत माहिती देणारे मेळावापूर्व प्रशिक्षण देखील आयोजित केले आहे. यातून मुलाखतीसाठी जाताना युवकांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा लाभ होईल, असा विश्वास खा. चव्हाण यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्तावित करताना आ. श्रीजया चव्हाण यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन मदत करावी, यासाठी आम्ही ‘युवा उमेद’ उपक्रम सुरु केला. या माध्यमातून रोजगाराची संधी व तरुणांमधील अंतर कमी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात यशवंत महाविद्यालयाच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.