दोन दिवसांत २२ गुन्हे, २६ आरोपी अटकेत, सुमारे १४.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला नांदेड परिसरात मोठा वेग आला असून, सलग दोन दिवसांच्या कारवाईत पोलिसांनी एकूण २२ गुन्हे दाखल करत २६ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत असून, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी १५ गुन्हे दाखल करून १७ आरोपींना अटक केली. नांदेड (७), हिंगोली (१), परभणी (४) आणि लातूर (३) अशा एकूण १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत ४ लाख ९६ हजार ६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर चौथ्या दिवशी नांदेड व परभणी जिल्ह्यातील इतवारा, शिवाजीनगर, देगलूर, हिमायतनगर, कोतवाली, देहणा आणि गंगाखेड परिसरात छापे टाकून ७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी ९ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मोहिमेदरम्यान गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची साठवण, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. दोषी आढळल्यास कठोर शिक्षा, दंड तसेच दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. दरम्यान, काही ठिकाणी गुटखा विक्रीसाठी फोनद्वारे मागणी घेतली जात असल्याची बाब समोर आली असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिकांनी ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 790 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अज्ञात ड्रोनच्या थव्यांनी हादरली अमेरिका घरफोडीत एक लाखांचे दागिने लंपास