नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीचा खून करणाऱ्या पोलीस अंमलदाराला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवस अर्थात 22 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि .17 सप्टेंबर रोजी सर्वत्र श्रीगणेश विसर्जनाची धुम सुरू असतांना सायंकाळी 6 वाजता आयडीयल वसाहत धनेगाव येथे राहणाऱ्या पोलीस अंमलदार अफजल खान जिलेखान पठाण (54) नेमणुक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पोलीस ठाणे विमानतळ याने आपल्या शासकीय बंदुकीतून पत्नीला गोळी मारली. त्यांची पत्नी नसीमा अफज पठाण (54) या त्यावेळी आपल्या घरातील टेबलवर कपड्यांना इस्त्री करत होत्या. मागून आलेल्या अफजल पठाणने त्यांच्या पाठीत गोळी मारली ती त्यांच्या सामोरच्या भागातून बाहेर निघाली. आपल्या पत्नीला गोळीमारून अफजल पठाणने बंदुक तेथेच ठेवली आणि ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाले आणि पोलीसांची हवाच गुल झाली. अफजल पठाण यांची मुले उच्च शिक्षीत आहेत आणि दुरदुर नोकरी करत आहेत. तेंव्हा नांदेड ग्रामीणमधील सहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा बन्सी काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी पोलीस अंमलदार अफजल पठाणविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) प्रमाणे गुन्हा क्रमांक 843/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गढवे हे करीत आहेत.
आज सचिन गढवे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी आपल्या पत्नीचा खून करणाऱ्या अफजल पठाणला न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची आवश्यकता सादर केली. पोलीसांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीशांनी अफजल पठाणला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी….