नांदेड(प्रतिनिधी)-31 ऑगस्टच्या दिवशी नांदेड जिल्ह्यात पाऊस सर्वत्र धुवून काढत होता आणि आजही पावसाचा तोच जोर कायम आहे. पुढील चार दिवस राहणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे 31 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टरने कोणतीही नोंद स्टेशन डायरीला न करता एक ऑपरेशन टुर केला आहे. त्यावेळी कंपाऊंडर सुध्दा त्यांच्यासोबत होते. गाडी शासकीय होती तरी पण आपण कोठे जात आहोत याची नोंद स्थानिक गुन्हा शाखेच्या डायरीत नाही म्हणजे नांदेड जिल्हा पोलीस दलातील कामकाज हे डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणेच सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच डॉक्टर सांगत होता की, मी मोठ्या अधिकाऱ्यांसोबतच काम करणार आहे. म्हणून स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक सुध्दा त्यांच्या बिना नोंदीच्या टुरबद्दल काही बोलत नाहीत.
31 ऑगस्ट शनिवार श्रावण कृष्ण पक्ष तृयोदशी, शनिप्रदोष, अश्वस्थ मारोती पुजन आणि पर्युषण पर्वारंभ या शुभ मुहूर्तावर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत नसतांना सुध्दा शस्त्रक्रिया करण्यात निपुण डॉक्टरने दौरा काढला. दौऱ्यासाठी शासकीय गाडीचा अर्थात एलसीबीच्या गाडीचा वापर झाला. पण त्या संदर्भाची नोंद कोणत्याच रजिस्टरमध्ये केलेली नाही. आता गाडीच्या लॉकबुकवर काय लिहिले हे पाहणे तर जरा अवघडच आहे. डॉक्टरांसोबत त्यांचे निष्णात कंपाऊंडर सुध्दा या दौऱ्यावर होते.
हा दौरा नांदेड, कंधार, मुखेड, जांब, जळकोट असा झाला आणि नंतर सुरु झाला परतीचा प्रवास. या दरम्यान त्यांनी कंधारमध्ये खुप मोठी कार्यवाही करून एक गुन्हा दाखल केला. त्या संदर्भाची सविस्तर माहिती लिहिली तर एवढ्या मोठ्या कार्यवाहीची बातमीच करावी असा तो वृत्तांत आहे. यानंतर पुढे मुखेड आले त्याच ठिकाणी महाराज भेटला याचे काय कामकाज आहे हे आम्ही लिहावे काय? त्यानंतर जांब आणि जळकोट या दोन गावांबद्दल ख्यातील आहे की, एक गाव लातूर जिल्ह्यात आहे आणि एक नांदेड जिल्ह्यात त्यामुळे या दोन्ही गावांकडे लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर भेट देतच असतात. या भेटीमध्ये काय ठरते हे काही लिहुन मिळत नसते. कोणी त्यावेळी मोबाईलवर बोलत नाही, ती ऑडीओ व्हायरल होत नाही, पण बोलणे होतच असते आणि ते सर्व काही पुरावा कायद्यातील परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारीत असते.
डॉक्टरांचा हा शस्त्रक्रियेचा दौरा किती यशस्वी झाला याबाबत शाब्बासकी तर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार हेच देवू शकतात ना! काही 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान डॉक्टर असा प्रचार करत होते की, मी नंबर 1 सोबतच यापुढे काम करणार आहे आणि 31 ऑगस्ट रोजी झालेला दौरा हे त्याचेच गमक आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे.
डॉक्टरची नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत नसतांना ते स्थानिक गुन्हा शाखेतच बसून राहतात. स्थानिक गुन्हा शाखेच्या गाड्या वापरतात असे गौड बंगाल सुरू आहे. अशाच प्रकारे बऱ्याच दुसऱ्या जागी नियुक्ती असणारे आणि स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्तीस असणारे काही पोलीस अंमलदार तिसऱ्याच ठिकाणी काम करत आहेत. या लोकांसाठी कोणता कायदा नाही काय? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.