नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या एका वस्तीत एका महिलेवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. खून करणाऱ्या युवकाने त्यानंतर लालवंडी ता.नायगाव येथे आपल्याच शेतात गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठी संतोष आलेवाड (25) रा.लालवंडी ता.नायगाव हा राहत होता. त्या युवकाच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. प्रेमसंबंध काही काळ छान चालले परंतू नंतर या दोघांमध्ये वितुष्ट आले. आज 31 ऑगस्टच्या सकाळी संतोश आलेवाडने त्या महिलेच्या पोटात चाकूचे अनेक वार करून तिला जखमी केले आणि तो पळून गेला. जखमी महिलेला उपचारासाठी नेले असतांना डॉक्टारांनी तिला मृत घोषित केले.
पळून गेलेला संतोष आलेवाड थेट आपल्या गावी लालवंड ता.नायगाव येथे गेला आणि त्याने आपल्याच शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. नांदेड येथे महिलेचा खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याची चर्चा वजिराबाद भागात ऐकावयास मिळाली.