नांदेड (प्रतिनिधी)- सध्या देशात नारी वंदना आणि महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात महिला लोकप्रतिनिधीच असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नांदेड येथील एका २१ वर्षीय तरुण नगरसेविकेला गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक छळ, विनयभंग आणि अगदी अपहरणाच्या धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या महिलेला जर अशा प्रकारच्या वागणुकीचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा संतप्त प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या परिसरातील सदर नगरसेविका आपल्या प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी फिरत असताना, आरोपी शेख जाकीर शेख सगीर, मोहसीन खान आणि त्यांच्या इतर साथीदारांकडून सातत्याने त्यांचा छळ केला जात आहे. २१ जून २०२६ रोजी नसीम कॉलनी परिसरात त्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना, आरोपींनी त्यांच्याकडे पाहून ये माल बहुत अच्छा है, इसको तो एक दिन उठा के लेके जायेंगे असे अत्यंत अश्लील आणि खालच्या पातळीवरील विधान केले . इतकेच नाही तर आरोपींनी ये ठुल्ले कि अशा शब्दांत त्यांची जाहीर छेड काढून अश्लील हावभाव देखील केले आहेत.
संबंधित नगरसेविकेने तक्रार अर्जात नमूद केले आहे की, आरोपी त्यांना सातत्याने नगरसेवक पद फार काळ टिकणार नाही आणि दुसरा इलेक्शन हम लगायेंगे (जसे काही हा ज्ञानेश कुमार आहे असे नगरसेविकेने वास्तव न्यूज लाईव्हला सांगितले) अशा धमक्या देऊन त्यांची सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सातत्यपूर्ण छळामुळे सदर नगरसेविकेच्या मनात स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर भीती निर्माण झाली असून, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंग, अश्लील टिप्पणी आणि धमकीबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असला तरी, अद्याप कडक कायदेशीर कारवाई झालेली नाही. एका महिला लोकप्रतिनिधीला जर न्यायासाठी आणि गु्न्हा दाखल करण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल, तर इतर सर्वसामान्य महिलांचे काय होणार? असा सवाल विचारला जात आहे. नांदेडमधील महिला सुरक्षेचा हा मुद्दा आता ऐरणीवर आला असून, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
