नांदेड- जिल्ह्याने सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष नियोजन करण्यात आले आहे.
ज्यामध्ये २ हजार ८८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ ग्रॅम पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या ६५ माता, डायबिटीस व तीव्र रक्तदाब असलेल्या ६ अशा एकूण ३३९ मातांना अति जोखमीचे निदान झाले, आणि त्यानुसार त्यांची संपूर्ण तपासणी व उपचार करण्यात आले.
या उत्कृष्ट कार्याची दखल राज्याच्या आयुक्त व संचालकांनी घेतली असून, नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी दर महिन्याच्या ९ तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.