नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने मुदखेड येथे टेकडीगल्लीमध्ये एका टिनपत्राच्या शेडमधून कत्तलीसाठी आणलेले वासरांसह 59 गायी आणि एक बैल असे 6 लाख 10 हजाराचे पशुधन पकडले आहे. तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून जनावरे गोशाळेत वर्ग करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुदखेड येथील टेकडीगल्ली, कुरेशी मोहल्ला येथे बरीच जनावरे डांबून ठेवण्यात आली आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, बालाजी यादगिरवाड, शिवा ढवळे, विजय तोडसांब आदींनी मुदखेड येथे छापा टाकला. तेथे महम्मद निसार महम्मद मदार, महम्मद सद्दाम महम्मद महेबुब, महम्मद फेरोज महम्मद ईस्माईल या तिघांच्या ताब्यात 59 गाय आणि वासरे तसेच 1 बैल असे एकूण 6 लाख 10 हजार रुपयांचे पशुधन सापडले. ही जनावरे कत्तलीसाठी आणली होती अशी माहिती पकडलेल्या तिघांनी दिली. त्यानुसार या तिघांसह त्यांना मदत करणारे, विक्री करणारे या सर्व लोकांविरुध्द मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.