नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर तालुक्यातील मौजे निमगाव येथे पाण्याच्या टाकी शेजारी गणपत सोळंके याच्या घरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अर्धापूर पोलीसांनी छापा टाकून 1 लाख 47 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार रुपेशकुमार शंकरराव नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास अर्धापूर पोलीस पथकाने मौजे निमगाव ता.अर्धापूर येथे पाण्याच्या टाकीच्या बाजूला असणाऱ्या गणपतराव सोळंके यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी विलास साहेबराव पाईकराव (31) रा.पिंपरखेड ता.हदगाव, काशिनाथ आबाजी मुळके रा.निमगाव ता.अर्धापूर, शेख गणी शेख जानिमियॉ (40) रा.निमगाव, शाम लक्ष्मण नेमाडे(26) रा.चौंडी ता.वसमत, शब्बीर इब्राहिम पिंजारी(54) रा.चौंडी ता.वसमत, गणपत रामजी सोळंके(44) रा.निमगाव, दिपक कोंडीबा भिसे(26) रा.पिंपरी चिंचवड पुणे ह.मु.निमगाव आणि वैभव शेंडगे रा.लोणी ता.अर्धापूर यांना पकडले. त्यांच्याजवळ असलेले टॅब संगणक, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 47 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वैभव शेंडगे यांच्या सांगणावरुन हा जुगार खेळत आहेत असे तक्रारीत लिहिले आहे. अर्धापूर पोलीसांनी आठ जणांविरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम 12(ए) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.