नांदेड :-नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून सरपंच पदापासून संसद सदस्य पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. एखाद्या पक्ष संघटनेमध्ये अगदी प्राथमिक पदापासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वावरणे तसेच खासदार पदापर्यंत एकनिष्ठतेने केलेली वाटचाल लक्षवेधी असून आदरास पात्र आहे, अशी संवेदना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
समाजकारण,राजकारण व सामाजिक जीवनामध्ये विविध पातळीवर त्यांनी आपले वेगळेपण जपून ठेवले होते. नुकतेच कुठे संसदेमध्ये त्यांचे कामकाज सुरू झाले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या असे मध्येच जाण्याचे दुःख आहे.
राजकीय वाटचाल कायम चढत्या कमानीने ठेवत त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक कायम ठेवल्याचा गर्व आहे. त्यांची साधी राहणी, कार्यकर्त्यांमध्ये थेट मिसळणे, आणि प्रत्येकाची कौटुंबिक जिव्हाळा ठेवत संबंध ठेवणे कायम लक्षात राहणारे आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबाप्रती मी माझ्या भावपूर्ण संवेदना व्यक्त करतो.