शिवमहापुराण कथा श्रवणात लाखो भाविक मंत्रमुग्ध
नांदेड (प्रतिनिधी)-जीवनात मान आणि अभिमान या दोघांनाही दूर ठेवले पाहिजे, या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढायला लागतात, तेव्हा अहंकाराची उत्पत्ती होते आणि अहंकार जेव्हा वाढतो, तेव्हा ज्ञानाचा, बुद्धीचा र्हास अटळ असतो, रावणाच्या जीवनातही तेच घडले,त्यापासून आपण धडा शिकला पाहिजे, शुद्ध पाण्यासारखेच शुद्ध मन आणि शुद्ध वाणी असायला हवी, असे प्रतिपादन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथा वाचनप्रसंगी केले. कथेच्या पाचव्या दिवशीही कथामंडपातील भाविकांची अलोट गर्दी कायमच होती. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना पंडितजींनी नमन केले.
पंडितची म्हणाले,शिवमहापुराण कथेत शिवजींना भक्त-वत्सल अशी उपमा दिली आहे, याबाबतची कथा त्यांनी विस्ताराने सांगितली. गोमातेकडे शिवपार्वतीने केलेली पार्थना, दिलेले वचन आणि गोमातेने गिळंकृत केलेल्या शिवजींना आपल्या उदरातून बाहेर काढतानाचा प्रसंग श्रवण करताना भाविक मंत्रमुग्ध झाले होते.शिवमहापुराणातील शिवलिंगाचे महत्त्व सांगताना पंडितजी म्हणाले, शिवलिंग कितीही मोठा असो, कितीही छोटा असो, कोणत्याही धातूचा असो, शिवालयात, मंदिरात, आपल्या निवासस्थानी अथवा तीर्थस्थळी असो, शिवलिंग हे शिवलिंगच असते आणि त्या शिवलिंगात शिवशंकराचे प्रतिबिंब असते, त्यामुळे शिवलिंगाची उपासना करताना मनात कुठलाच संकोच नसावा, श्रद्धापूर्वक नामस्मरण, पूजन, जलार्पण केले पाहिजे.
पंडितजींनी धर्मसंस्कारा अभावी बालमनावर होणारे दुष्परिणाम कथन करून माता-पित्यांनी मुलांवर चांगले संस्कार करा, धार्मिक कार्याची आवड मुलांवर संस्कारित केले पाहिजेत असे आवाहन केले.मुलांना सनातन धर्माचे महत्त्व पटवून द्या, कोणत्याही धार्मिक कार्यात सहभाग घेण्यापासून त्याला थांबवू नका,असा संदेश त्यांनी दिला.
पोट भरण्यासाठी नित्य भोजन आवश्यक असते, तसेच परमात्मा प्राप्तीसाठी नित्य भजनही गरजेचे आहे,कोणत्याही गोष्टीची चिंता करून उपयोग नाही, चिंतेला अंतर्मनात ठेवून नका, तिला बाहेर काढा, श्रद्धा-सबुरी ठेवा, चांगली वेळ नक्कीच येईल, गोमातेच्या उदरात 33 कोटी देवांसोबत भगवान शंकरही विराजमान आहेत, गोमातेची सेवा करा, ती केवळ गोशाळेत अथवा रस्त्यावर नसावी, तर आपल्या घरी असावी, कितीही संकटे आली तरी कोणाकडे याचना करू नका, शिवालयात जा, शिवमंदिरात जा, प्रार्थना करा, उपासना करा, आपल्या भक्तांसाठी भोलेबाबा नक्कीच धावून येतील, यावर विश्वास ठेवा.
व्यापारात, व्यवहारात, नोकरीत चुकून आपल्याकडून काही पाप घडले असेल, अपराध घडला असेल, तर मंदिरात जावून क्षमा मागू नका, ज्या ठिकाणी अपराध घडला त्याच ठिकाणी शिवशंकराकडे क्षमायाचना करा, असाही उपदेश गुरुजींनी दिला.
शिवमहापुराण कथेचा बुधवार दि. 28 रोजी सहावा दिसून असून ही कथा नियोजित वेळेत म्हणजे दुपारी 1 ते 4 या वेळेतच होईल, परंतु गुरुवार दि. 29 ऑगस्ट रोजी कथेचा सातवा आणि समाप्तीचा दिवस असून त्या दिवशी कथा सकाळी 8 ते 11 या वेळेत होईल, असे पंडितजींनी सांगितले.