नांदेड,(प्रतिनिधी)- जून 2024 मध्ये जनतेने खासदार पदावर विराजमान केलेले श्रीमान वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्यांच्या उपचाराला प्रतिसाद आला नाही आणि त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे.
वसंतराव चव्हाण 1978 मध्ये नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच झाले आणि सलग 24 वर्ष त्यांनी सरपंच पद भूषवले. 1990 ते 1995 दरम्यान ते जिल्हा परिषद सदस्य होते. सन 2002 मध्ये त्यांची जिल्हा परिषद सदस्य पदी दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य होते 2002 ते 2008 दरम्यान ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होते. 2009 2014 दरम्यान अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढविली आणि ते विधानसभेचे सदस्य झाले. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचे सदस्य होते. संसदीय कामकाज पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोप खंडाचा दौरा पण केला होता. 2014 ते 2019 दरम्यान विधानसभा सदस्य होते, त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. महाराष्ट्र राज्याच्या अंदाज समितीचे ते सदस्य होते. 2016 ते 2022 दरम्यान ते कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव चे सभापती होते. 2021 ते 2023 दरम्यान ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते. नायगाव तालुका त्यांच्याच पुढाकाराने तयार झाला होता. 4 जून 2024 रोजी लोकसभेचे सदस्य झाले.
1993 मध्ये किल्लारी जिल्हा लातूर येथे झालेल्या भूकंपग्रस्तांची भरीव मदत केली होती. त्यांनी दलितवस्ती सुधारणा यशस्वीपणे अंमलबजावणीत आणली. नायगाव शहराला नवीन पाणीपुरवठा योजना जिगळा तलावातून मंजूर करून घेण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. झोपडपट्टी वासीयांना नायगावच्या अमृतनगर मध्ये पक्की घरे उपलब्ध करून दिली आहेत अनेक मोफत रोग निदान शिबिर वाहन व रक्तदान शिबिरांचे त्यांनी आपल्या जीवनात आयोजन केले होते. कोलंबी उपसा जलसिंचन योजनेसाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. बळेगाव बंधारा निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. नायगाव बाजार येथे बेघर बाई लेकी साठी जावई नगरची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या मतदारसंघात 942 घरकुलांचे वाटप करण्यात आले
1992 मध्ये मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करताना त्यांनी आयोजक आणि स्वागताध्यक्ष अशा भूमिका पार पाडल्या. 1998 मध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार सोहळा त्यांनी आयोजित केला होता. ग्रामीण कलावंतांसाठी अनेक भजन, कीर्तन सोहळ्यांचे आयोजन त्यांनी केले होते. 2009 मध्ये मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करून त्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक शैक्षणिक मेळाव्यांचे पण आयोजन केले होते.
नायगाव एज्युकेशन सोसायटीचे ते सदस्य होते. 1990 मध्ये ते एज्युकेशन सोसायटीचे सचिव झाले सन 2002 मध्ये कृषी महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अन्नतंत्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यांनी अध्यापक महाविद्यालयाची सुरुवात केली. डी फार्मसी बी फार्मसी महाविद्यालयांची त्यांनी उभारणी केली. तंत्रनिकेतन विद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची त्यांनी सुरुवात केली. 2008 पासून ते एज्युकेशन सोसायटी नायगावचे अध्यक्ष झाले. मराठवाड्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नायगाव शिक्षण संस्थेचे नाव आहे.
खासदार पदावर विराजमान झाल्यानंतर परमेश्वराने त्यांनी त्यांना खूप कमी वेळ दिला, त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाची छाया पसरली आहे. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सुद्धा चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.