मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्ज 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मागविण्यात आली आहेत.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 6 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे (उदा :- चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-बेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.) खरेदी करण्याकरिता राज्य शासनाने “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु केलेली असून पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणेसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालय व कार्यालय अधिनस्त तालुकाच्या ठिकाणी कार्यरत मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे कार्यालयीन वेळेत पुढीलप्रमाणे दिलेल्या तालुकानिहाय वसतिगृह व निवासी शाळेस अर्ज सादर करावेत.

 

गुणवंत मुलाचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी तालुका नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बिलोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धर्माबाद, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देगलूर, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मुखेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हदगाव, मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह भोकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव, अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय निवासी शाळा माहूर तसेच वरील नमुद शाळा व वसतीगृह या व्यक्तीरिक्त सदर योजनेचे ग्रामपंचायत अंतर्गत अर्ज ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित गावची ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी पंचायत समिती, संबंधित तालुका याठिकाणी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत.

 

अर्जासोबतची कागदपत्रे

दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावे. आधार कार्ड / मतदान कार्ड, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसिलदार तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे. स्वयंघोषणापत्र CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमुद करण्यात यावे. वरील नमूद साधनांपैकी पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमुद करावी. ही कागदपत्रे पुर्ण करणारे लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत तालुका निहाय दिलेल्या ठिकाणी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!