नांदेड(प्रतिनिधी)-बांगलादेशात राजकीय संकट उभे राहिल्यानंतर तेथे हिंदुंवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी तयार झालेल्या रोषाला नांदेडकरांनी आज उत्स्फुर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला.
बांगलादेशात आरक्षणामुळे राजकीय संकट समोर आले आणि तेथे अशांतता माजली. या घटनेनंतर 1972 च्या प्रकरणाला ऊत आणून काही समाजकंटकांनी हिंदु नागरीकांना लक्ष केले. त्यात मारहाण, खून, अत्याचार असे अनेक प्रकार घडले. हिंदुवर होणाऱ्या या अत्याचाराबद्दल भारत देशात रोष आहे. तसेच दुसराा प्रकार पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथे घडला. तेथे एका डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेचा रोष सुध्दा संपुर्ण देशात पसरलेलाा होता.
अनेक संघटनांनी या दोन्ही घटनांच्याविरोधात आज दि.17 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा बंदचे आवाहन केले होते. या आवाहानाला जनतेने सुध्दा सकळापासूनच प्रतिसाद दिला. सकाळी रस्त्यावर लागणारे अनेक न्याहरीचे गाडे बंद होते. त्यानंतर दुकान उघडण्याची वेळ झाली तोपर्यंत कावड यात्रा निघाली. यासोबतच बंद करणाऱ्यांची संख्या सुध्दा होती. काही ठिकाणी दुकाने उघडली होती. मात्र बंद पुकारलेल्या युवकांच्या सांगण्याला दुकानदारांनी प्रतिसाद देत दुकाने बंद केली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्हाभरात पुकारण्यात आलेल्या या बंदमुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, अनेक पोलीस उपअधिक्षक, अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सकाळपासूनच मेहनत घेत होते.