नांदेड(प्रतिनिधी)-नवा मोंढा गॅस गोडाऊन रोडवर भर दुपारी दोन अज्ञात दरोडेखोरांनी एका महिलेची पर्स चोरली या पर्समध्ये 50 हजार रुपये होते. तसेच अर्धापूर शहरातील बॅंक ऑफ इंडिया शाखेत एका व्यक्तीच्या खिशातून गर्दीचा फायदा घेवून दोन चोरट्यांनी 50 हजार रुपये लांबवले आहेत. देगाव शिवार ता.नायगाव येथून 69 हजार रुपये किंमतीचे 6 पशुधन चोरीला गेले आहेत.
अंकिता एकनाथ तुपसमिंदर या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता त्या गॅस गोडाऊन रस्ता, नवा मोंढा येथून आपल्या घराकडे पायी जात असतांना त्यांच्या समोरून एका दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात दरोडेखोरांनी त्यांची पर्स बळजबरीने चोरून नेली .
शिवाजीनगर पोलीसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 329/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार वाघमारे हे करणार आहेत.
सदाशिव लक्ष्मण गुंजकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता ते स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा अर्धापूर येथे गेले होते. त्यांनी बॅंकेतून 1 लाख रुपये उचलले. त्यातून 50 हजार रुपये त्यांनी पॅन्टच्या समोरच्या खिशात ठेवले आणि 50 हजार रुपये वॉच पॉकिटमध्ये ठेवले. त्यानंतर ते चेक जमा करण्यासाठी गर्दीच्या लाईनमध्ये थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी 22 ते 25 वयोगटातील चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या पुढच्या खिशात ठेवलेले 50 हजार रुपये चोरून नेले आहेत. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 442/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार कांबळे हे करत आहेत.
राजेश व्यंकट मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे देगाव शिवारात ता.नायगाव येथे त्यांचे शेत आहे. त्यांच्या शेताच्या आकाड्यावर बांधलेल्या दोन गाई, दोन कारवडी आणि दोन गोरे असे 6 पशुधन ज्याची किंमत 69 हजार रुपये आहे. ते चोरट्यांनी 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 1 ते 4 या वेळेदरम्यान चोरून नेले आहेत. कुंटूर पोलीसांनी हा गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) प्रमाणे क्रमांक 161/2024 नुसार नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कंधारे हे करणार आहेत.