नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे फॉरेन्सीक ऑडीट त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्याची कार्यवाही बॅंकेने जाणून बुजून टाळल्यानंतर ममतानगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था ब्रम्हपुरी ता.जि.नांदेडचे अध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी 8 ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्राची दखल जिल्हा उपनिबंधक विश्र्वास देशमुख यांनी घेतली असून याबद्दलची माहिती विचारणारे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नांदेड यांना पाठविले आहे.27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत फॉरेन्सीक ऑडीटचा विषय घेण्यात यावा असे या पत्रात लिहिले आहे.
बॅंकेतची प्रणाली बाबत माहिती मिळविण्याचा मुलभुत अधिकार असतांना रिपब्लिकन गार्डचे संपादक विजयदादा सोनवणे यांनी अर्ज दिल्यानंतर सुध्दा फॉरेन्सीक ऑडीट झाले नाही. त्यानंतर ममतानगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी 8 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मध्यवर्ती सहकारी बॅंक नांदेड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, विभागीय सहनिबंधक संस्था लातूर आदींना पत्र पाठविले होते. या पत्रात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सन 2023-2024 या आर्थिक वर्षाची 97 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 27 ऑगस्ट 2024 रोजी होत आहे. या सभेपुढे असा विषय मांडण्यात येते की, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्ह्यातील 63 शाखांचे डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सीक ऑडीट सक्षम त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यासाठीचा विषय संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठेवून कार्यवाही करण्याबाबतचे आदेश विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था लातूर तसेच बॅंकेचे नोंदणी निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी दिल्यानंतर सुध्दा अद्याप ते ऑडीट पुर्ण झालेले नाही.
दि.21 जानेवारी 2024 रोजी संचालक मंडळाच्या सभेमध्ये बॅंकेचे डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सीक ऑडीट होण्याबाबत होकार दर्शविला होता. तरीपण बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा बॅंकेच्या 63 शाखांचे फॉरेन्सिक ऑडीट केलेले नाही. असे का झाले या बाबत येत्या 27 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत माहिती देण्यात यावी. ही माहिती जाणून घेण्याचा बॅंकेच्या प्रत्येक भागभांडवलधाराचा मुलभुत अधिकार आहे. तेंव्हा बॅंकेने फॉरेन्सीक ऑडीट बाबत 27 ऑगस्टच्या बैठकीत विषय मांडणी करून बॅंकेला याचे पत्र द्यावे आणि एक प्रत माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना पाठवावी असे विश्र्वास देशमुख यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
प्रा.राजू सोनसळे यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, बॅंकेतील अनेक अधिकारी, अनेक कर्मचारी यांनी फौजदारी कट रचून बॅंकेच्या सदस्यांना आणि शासनाला करोडो रुपयांचा चुना लावलेला आहे. त्यासाठीच या बॅंकेचे फॉरेन्सिक ऑडीट होणे अत्यंत महत्वपुर्ण आहे. माझ्या पत्राला योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन केले जाईल असे प्रा.राजू सोनसळे हे सांगत होते.