नांदेड(प्रतिनिधी)-22 महिने नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक या पदावर काम करतांना माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांसोबत मी कुटूंब प्रमुख याच पध्दतीने वागलो. तुम्ही सर्वांनी दिलेल्या सहकाऱ्यासाठी आभार व्यक्त करतो आणि नुतन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना यशस्वीभव असा आशिर्वाद देतो अशा शब्दात नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या निरोप समारंभाला उत्तर दिले.
7 ऑगस्ट रोजी नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली करण्यात आली. सध्या ते नवीन पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत. श्रीकृष्ण कोकाटे यांच्या जागी नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनाच पदोन्नती देवून शासनाने त्यांना पदस्थापना देण्यात आली. 8 ऑगस्ट रोजी अबिनाशकुमार यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आणि कामकाज सुरू झाले. आज माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना नुतन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधिक्षक, सर्व पोलीस निरिक्षक, अनेक सहाय्यक पोलीस निरिक्षक, अनेक पोलीस उपनिरिक्षक यांनी सन्मान करून निरोप दिला.
या प्रसंगी पुढे बोलतांना श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, माझ्या पोलीस सेवाकाळातील माझा पहिलाच जिल्हा होता. त्यामुळे मला सुध्दा आव्हान होते. या आव्हानात आताचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधिक्षक, सर्व 36 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, इतर सर्व अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी माझ्या कर्तव्यात केलेल्या मदतीमुळेच मी 22 महिन्यांचा कार्यकाळ अत्यंत उत्कृष्टपणे पुर्ण केला आहे. माझ्या सेवाकाळात पंतप्रधानांच्या सभा, राहुल गांधी यांची पदयात्रा, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभा, मराठा आरक्षण प्रश्न अशा अनेक संवेदनशिल कामांवर काम करतांना तुम्हा सर्वांमुळे मला यश आले. नांदेड जिल्ह्याचा पोलीस प्रमुख अर्थात कुटूंब प्रमुख मी याच पध्दतीने तुमच्यासोबत वागलो. त्यात तुमचा लाडही केला, तुम्हाला रागावलो पण अशा सर्व पध्दतीने काम करत मी एका वडीलासारखा वागलो. माझ्या सेवाकाळात माझ्या बोलण्याने कोणाचे मन दु:खले असेल तर त्या बाबत मी खेद व्यक्त करतो.
या कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले, माझे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासोबत काम करतांना मी भरपूर काही शिकले आहे. माझ्या पोलीस सेवा काळातील लोकसभेची निवडणुक हा पहिला बंदोबस्त मी कोकाटे यांच्या मार्गदर्शनातच पुर्ण केला आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी माझी सक्षमता दाखविण्यासाठी आता सज्ज आहे. या प्रसंगी पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, विजय जोशी, कुवरचंद मंडले, कंथक सुर्यतळ यांनी सुध्दा माजी पोलीस अधिक्षक यांच्या भविष्यासाठी शुभकामना दिल्या.