नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या खाजगी वाहनांवर पोलीस विभागाचे बोधचिन्ह आणि पोलीस असे शब्द लिहिले असतील तर त्याविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई पुर्वचे एस.ए.गिरी यांनी राज्यभरातील वायुवेग पथकातील मोटार वाहन निरिक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक यांना दिले आहे.या संदर्भाची तक्रार पत्रकाराने केलेली आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.ए.गिरी यांनी 6 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार पत्रकार विक्की कुंडलिक जाधव यांनी ईमेलद्वारे 16 जुलै 2024 रोजी पाठविलेली तक्रार अशी आहे की, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खाजगी वाहनावर पोलीस विभागाचे बोध चिन्ह तसेच पोलीस असे शब्द लिहुन गाड्यांचा वापर करतात. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. या तक्रारीनुसार सर्व जिल्ह्यातील वायुवेग पथकांमध्ये कार्यरत मोटारवाहन निरिक्षक आणि सहाय्यक मोटारवाहन निरिक्षक यांना आदेश देण्यात आले आहेत की, आप-आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस हे शब्द लिहिलेले असतील तर त्या वाहनांना आणि महाराष्ट्र शासन असे शब्द किंवा बोध चिन्ह वापरलेले असेल तर वाहन मालकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतूदीनुसार काटेकोर कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा खटला विभागात न चुकता दाखल करावा.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला फक्त बोधचिन्ह आणि पोलीस या शब्दाविषयी तक्रार आली आहे. काही पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार नोकरीत असतांना आणि सेवानिवृत्तीनंतर सुध्दा आपल्या वाहनात आपल्या डोक्यावर धारण करण्याची टोपी समोर दिसत्या जागी ठेवतात आणि मी पोलीस आहे असे भासवतात. काही गाड्यांची तपासणी केली तर या गाड्यांमध्ये पिवळे लाईट दिवे असतात. रात्रीच्या वेळी हे वाहन मालक या लाईटचा वापर करतात. ज्या वाहनांमध्ये टोपी ठेवलेली आहे त्या वाहनातील वाहनधारक पोलीसाची गाडी आहे म्हणून टोल सुध्दा देत नाहीत. या बाबत बहुदा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला माहिती नसावी आणि माहिती असेल तर त्या बाबत कानाडोळा केला असावा.