नांदेड(प्रतिनिधी)-किनवटमध्ये एटीएम मशीनचा पासवर्ड वापरूनच त्यातून 500 रुपये दराच्या 3479 नोटा एकूण किंमत 17 लाख 39 हजार 500 रुपये चोरट्यांनी चोरले होते. या प्रकरणात रक्षकच भक्षक झाले हे नुतन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या टिमने काही तासातच शोधून काढले. त्यातील तीन जणांना अटक केली आहे. हे तीन आरोपी भाग्यलक्ष्मी महिला बॅंकेत नोकर आहेत.
किनवट शहरात भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएममधून 17 लाख 39 हजार 500 रुपये चोरीला गेले होते. त्या प्रकरणी किनवट पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 235/2024 दाखल झाल्याची माहिती पोलीसांनी 9 ऑगस्टच्या प्रेसनोटमध्ये दिली होती. नुतन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक, किनवटचे पोलीस पथक या सर्वांनी एकत्रीत मेहनत करून या बॅंकेत काम करणारे कॅशिअर भारत देविदास सोनटक्के (58), लिपीक रितेश संग्राम विराळे(30) आणि शिपाई गितेश नारायण भिमनेन्नीवार(33) या तिघांना अटक केली. या रक्षकांनीच भकक्ष बनतांना संपुर्ण कट रचून ही चोरी केली होती. त्यांनी एटीएममधील सीसीटी कॅमेरा खराब आहे या नावाखाली बंद ठेवला आणि त्यानंतर एटीएमचा पासवर्ड वापरून 17 लाख 39 हजार 500 रुपये चोरले.
आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी हा गुन्हा उघडकेल्याची माहिती देतांना या गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 306 सुध्दा जोडलेले आहे. पोलीसांनी या चोरट्यांकडून 11 लाख रुपये रोख रक्कम आणि शिपाई गितेशने चोरीच्या पैशातून खरेदी केलेले 4 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे असा एकूण 15 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अत्यंत कमी वेळात ही कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी किनवटचे पोलीस निरिक्षक सुनिल बिरला, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक सागर झाडे, दिनेश येवले, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, गजानन डुकरे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, मोतीराम पवार, अनिल बिरादार यांचे कौतुक केले आहे.