नांदेड(प्रतिनिधी)-हवामान खात्याने अचुक अंदाज दिला. मान्सुन महाराष्ट्रात दाखल झाले असून मृगनक्षत्र दि.7 रोज शुक्रवारी निघाले. मृगनक्षत्राच्या स्वागतासाठी पावसानेही जोरदार हजेरी लावून स्वागत केले. दुसऱ्या दिवशीही नांदेड शहरातसह जिल्ह्यातील अनेक भागात मृगधारा कोसळल्याचा आनंद अनेकांना झाला. गेल्या अनेक महिन्यापासून उकाड्यापासून त्रस्त असणाऱ्या नागरीकांना आता दिलासा मिळाला आहे.
मान्सुनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. हा अंदाज तंतोतंत ठरत मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मृगनक्षत्र हे बळीराजासाठी लाभदायक ठरत असत. बळीराजा हा या मृगनक्षत्राची वाट चातक पक्षाप्रमाणे पाहतो. चातक पक्षी हा मृगनक्षत्राचा पहिला थेंब आपल्या तोंडात अलगद झेलून तो आपली तृष्णा भागवतो. त्याचप्रमाणे शेतकरीही देखील या पावसावरच आपली शेतीतील पेरणी पुर्णत्वास नेत असतो. एकीकडे मृगनक्षत्रात पडलेलाा पाऊस शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना लाभदायकच असतो. उन्हाळ्यातील उकाडा घालविण्यासाठी हा पाऊस महत्वाचा ठरतो आणि मागील अनेक महिन्यापासून नांदेडकर आणि जिल्ह्यातील नागरीकांना या उष्णतेचा तडका सहन करावा लागत होता. अखेर दोन दिवसापासून नांदेड व जिल्ह्यातील काही भागात या पावसाने हजेरी लावली आणि अनेकांना गारेगार केले.