- पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील पशुधनाचे १०० टक्के इअर टॅगिंग करण्यासाठीची प्रक्रिया एक जून पासून जिल्ह्यात सुरू होत आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी आवश्यक व अनिवार्य आहे.या प्रक्रियेला प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जनावरांची खरेदी-विक्री, शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील पशुधनास 100 टक्के ईअर टॅगिंग करुन त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
जनावरांच्या बाजारात ईअर टॅगिंग नसलेले पशुधन असल्यास त्यांची तिथेच ईअर टॅगिंग करण्याच्या दृष्टीने पशुधन विकास अधिकारी ,पशुधन पर्यवेक्षक यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
नांदेड जिल्हयांमधील कार्यरत एकूण ७ फिरते पशुचिकित्सापथक यांची प्रत्येक जनावराच्या बाजारांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे बाजारातील पशुधनास आवश्यक पशुवैद्यकीय सेवा तसेच विषयांकित बाबींच्या अनुषंगाने शेतकरी पशुपालक, जनावरांचे व्यापारी यांचे प्रबोधन होईल.
ईअर टॅगिंगमुळे विशिष्ठ भागातून जनावरांची खरेदी-विक्री, चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, दुष्काळ याअनुषंगाने पुरावाजन्य निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी-विक्री टॅगिंग करुन झाल्यास त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करता येईल व बाहेरच्या राज्यातून आजारी जनावरे राज्यात दाखल झाल्याने होणारे साथरोग प्रादूर्भाव यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
पशुधनाच्या बाजारामध्ये खरेदी –विक्रीसाठी पशुधनाची माहिती विक्री करण्यात आलेल्या संबंधीत जिल्हयाच्या पशुसंवर्धन विभागास सादर करणे तसेच खरेदी-विक्री करण्यात आलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग करुन नोंदी अदयावत करणे बाबत निर्देशित केले आहे. बाजारामध्ये पशुधनाची ने-आण करताना कोणत्याही प्रकारची क्रुरता होणार नाही याची देखील दक्षता बाळगणे आवश्यक आहे. प्राण्यांमधील क्रुरतेस प्रतिबंध अधिनियम 1962 (जनावरांच्या बाजारांची नियमावली-2017) तसेच शासन निर्णयाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व पशुधनाचे आठवडी बाजार , कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी याची तात्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात सुमारे 12 पेक्षा अधिक जनावरांचे बाजार भरतात. ज्यातील पाच बाजार सर्वात मोठे असून त्यामध्ये 100 पेक्षा अधिक पशुधनाची खरेदी –विक्री करण्यात येते. ईतर पशुधनाच्या बाजारांमध्ये कमी, मध्यम संख्येच्या पशुधनाची खरेदी –विक्री केली जाते. नांदेड जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांना जनावरांच्या बाजारामध्ये सर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत जबाबदारी देण्यात आलेली आहे.