नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 मे रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चाकी वाहनातील दरोडेखोरांनी एका व्यक्तीचे 2 लाख रुपये रोख रक्कम लुटली होती. त्या प्रकरणात अर्धापूर पोलीसांनी 6 दरोडेखोरांना अटक केली असून सध्या ते 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. आज पोलीसांनी अर्धापूरपासून जवळच एका शेताच्या आखाड्यावरून दरोडा टाकतांना वापरलेली चार चाकी गाडी जप्त केली आहे.
दि.13 मे रोजी रात्री 9.30 वाजता दुचाकीवर जाणाऱ्या दोन जणांना रोखून एका चार चाकी गाडीतील लोकांनी त्यांच्याकडे असलेली 2 लाख रुपये रोख रक्कम लुटून नेली होती. त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अर्धापूर पोलीसांनी सहा आरोपींना पकडले. सध्या ते सहा दरोडेखोर 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पण त्या प्रकरणातील दरोडेखोरांनी वापरलेली चार चाकी गाडी पोलीसांनी आज शोधली. अर्धापूर पासून जवळच असलेल्या एका शेताच्या आखाड्यावर ही चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.के.0841 उभी होती. या गाडीचे मालक गोविंद सदाशिव गिरे हे आहेत. पण त्याची नंबर प्लेट बदललेली होती.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी नांदेड ग्रामीण उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन, पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरिक्षक शेख आयुब, पोलीस अंमलदार आडे, डांगे, बेग आणि कदम यांचे कौतुक केले आहे.