मुखेड आत्महत्या प्रकरणात मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार नांदेडच्या काही पत्रकारांनी केला

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकारांचा धंदा उधळून लावला
नांदेड(प्रतिनिधी)-समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणात मड्यावरचे लोणी खात अनेक वृत्तवाहिन्यांनी त्या बातमीला प्रसारीतच केले नाही. काल मुखेडमध्ये असाच एक आत्महत्येचा प्रकार घडला. त्यात तर एकाच पत्रकाराने जिल्हा भराच्या पत्रकारांची विक्री केल्याची माहिती हाती आली आहे. पण पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार हे बारकाईने या घटनेवर लक्ष ठेवून होते. आज त्या संदर्भाने मुखेड पोलीसांनी स्वत:च फिर्यादी होवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेत आहेत.म्हणजेच आम्ही पत्रकारांपेक्षा चांगलेच आहोत हे दाखवून दिले आहे.
काल मुखेड शहरात शेख सत्तार शेख अमीरोद्दीन (48) या व्यक्तीने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. कालपासून आज आम्ही वृत्त प्रसारीत करेपर्यंत या आत्महत्या प्रकरणात बऱ्याच चर्चा झाल्या. कोणी सांगत होते, व्याजाचा धंदा आहे. कोणी सांगत होते व्याजाने पैसे घेतले होते. कोणी सांगत होते परवा रात्री आयपीएल क्रिकेट प्रकारात सनराईज हैद्राबाद विरुध्द राजस्थान रॉयल्स या सामान्यातील बेटींगचे कारण या आत्महत्ये मागे आहे. सोबतच कोणी सांगत होते काही राजकीय नेत्यांच्या नातलगांचा यात हात आहे.
या संदर्भाने आम्ही घेतलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची भरपूर दाबादाबी झाली. कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या नेत्याचा मी मित्र आहे असे सांगणाऱ्या एका पत्रकाराने सर्व जिल्ह्याच्या पत्रकारांची विक्री करत मी या घटनेला बातमी होवू देणार नाही याची सुपारी घेतली. पण काही पत्रकारांनी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना विचारणा केल्यानंतर चौकशी अंती आम्ही याचा निर्णय घेवू असे सांगितले होते.त्यानुसार पोलीसांनी याची चौकशी सुरूच ठेवली आणि स्थानिक स्तरावर या प्रकरणाला सुरू असलेल्या दाबादाबीला काटशह देत आज मुखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख सत्तार शेख अमिरोद्दीन यांना आत्महत्येस प्रवृत्त केले या सदराखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल होत आहे. या प्रकरणात आरोपीच्या सदरात फिरोज महम्मद सय्यद उर्फ एफ.एम. या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 34 जोडलेले आहे. म्हणजे यातील राजकीय किंवा इतर व्यक्तींचे नाव पोलीस आपल्या तपासात निष्पन्न करतील. याचा अर्थ एकापेक्षा जास्त लोकांनी हे प्रकरण दाबण्याचा जोपर्यंत केला. त्याला चपराक दिली आहे.
तिन दिवसांपुर्वी नांदेडच्या अंबिकानगरमध्ये समीर येवतीकर यांच्या आत्महत्येची बातमी सुध्दा अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसारीतच केली नाही. त्याही प्रकरणात राजकीय लोक आरोपी आहेत. मुखेडच्या प्रकरणात सुध्दा राजकीय लोक असल्याची चर्चा सुरू आहे. नांदेडच्या आत्महत्याप्रकरणात सुध्दा काही पत्रकारांनी मड्यावरचे लोणी खाले तसाच काहीसा प्रकार मुखेडमध्ये सुध्दा काही नांदेडच्या पत्रकारांनी केला आहे. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेली प्रसार माध्यमे आणि त्यांचे प्रतिनिधी असे वागत असले तरी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासारखे अधिकारी मड्यावरील लोणी खाणाऱ्यांचा हिशोब बरोबर करतीलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *