मान्‍सुन पूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश

नांदेड:- घाटकोपर, मुंबई येथे 3 मे रोजी जाहिरात फलक कोसळल्‍याची दुर्घटना घडलेली आहे. यात जीवीत व वित्तहानी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरी व ग्रामीण भागातील संबंधित यंत्रणाना दिले आहेत.

शहरी भागातील व महामार्गावरील लावण्‍यात आलेल्‍या जाहिरात फलकांचे (होर्डींग) रचनात्‍मक (स्ट्रक्चर ऑडीट) तपासणी करावेत. तपासणीअंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करुन संबंधीतावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्‍यासाठी व दक्षतेची बाब म्‍हणून नैसर्गिक आपत्‍ती समयी जाहि‍रात फलकाच्‍या आजू-बाजूला न थांबण्‍याबाबत सुचनाही नागरीकांना दिल्या आहेत. घाटकोपर, मुंबई येथे मोठी दुर्घटना घडल्‍यामुळे जीवीत व वित्तहानी झाली असून या अगोदरही पुणे शहरामध्‍ये 6 ऑक्टोबर 2018 रोजी अशीच दुर्घटना घडलेली होती. त्‍यामध्‍येही जीवीत व वित्तहानी झालेली होती. अशा स्‍वरुपाची घटना मान्‍सून काळात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसामुळे होऊ शकतात. अशा दुर्घटना घडू नये यासाठी शासनाच्‍या सुचनेनुसार शहरी भागातील व महामार्गावरील लावण्‍यात आलेल्‍या जाहिरात फलकांचे रचनात्‍मक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *