इस्त्री केलेलं म्हातारपण !

ट्रेनमधून लांबच्या प्रवासाला चाललो होतो.

समोरच्या सीटवर एक काका होते. टी शर्ट, जीन्स, स्पोर्ट्स शूज, कानात pods, मनगटावर डिजिटल घड्याळ, पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, तुकतुकीत चेहरा.

कुतूहल चाळवून मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. प्रवासात आमच्या गप्पा सुरु झाल्या. काका भलतेच गप्पिष्ट होते. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो. राजकारण, क्रिकेट, प्रवास…गंमत म्हणजे ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते.

गप्पांमध्ये मी हळूच काकांना त्यांचं वय विचारलं. त्यांनी सांगितलं. मी उडालोच.

‘सॉरी ! मी तुम्हाला आजोबा म्हणायला हवं होतं का?’ मी गमतीत म्हणालो.

काका जोरात हसले. ‘तुम्ही मला रवि म्हटलंत तरी I am fine !’

आम्ही दोघेही हसलो.

काकांचं स्टेशन जवळ आलं. एक कडक शेकहॅण्ड करत काकांनी आमच्या दोघांचा एक सेल्फी घेतला.

 

गाडी पुढे निघाली. मी ट्रेनमध्ये आजूबाजूला पाहिलं. सगळे म्हातारे खंगलेले ! इस्त्री गेलेल्या कपड्यासारखे. वैभव उडून गेलेल्या एखाद्या राजवाड्यासारखे !

 

योगायोग बघा. मी तेव्हा गुलज़ारच्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकत होतो.

गाणी ऐकताना आपसूक गुलज़ारसाहेब डोळ्यासमोर येत होते. एका क्षणी एकदम मनात आलं, अरे या माणसाने इतकी वर्षं कशी सांभाळली असेल स्वतःची ‘इस्त्री’?

आपण स्वतः कशी सांभाळणार आहोत स्वतःची इस्त्री? विचार ट्रेनच्या पुढे धावू लागले.

 

एक म्हणजे स्वतःची तब्येत उत्तम ठेवणं. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप.

सध्याचं माहीत नाही, पण गुलज़ारसाहेब नियमित टेनिस खेळतात. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका स्पर्धेत ते जिंकले वगैरे होते.

 

दुसरं म्हणजे, कार्यरत असणं. बँकेची पासबुकं भरायला स्टेट बँकेत लाईन लावणं याला मी कार्यरत नाही म्हणणार. आताच्या काळात तो वेळेचा अपव्यय आहे. टाईमपास आहे. कार्यरत म्हणजे तुमच्या आवडीच्या कामात creatively गुंतून राहणं. लिखाण, संगीत, शिकवणं, चित्रकला, स्वतःच्या गाडीचं सर्व्हिसिंग, बागकाम, वाचन… असं काहीही. रोजचं एक रुटीन असणं. रुटीन म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत बिनडोक टीव्ही सिरियल्स बघणे नव्हे. स्वतःला enrich करणारं, बुद्धीला आव्हान देणारं काहीतरी करत राहणं. गुलज़ारसाहेब रोज नियमितपणे लिहितात. ते कोणी वाचो वा न वाचो.

 

तिसरं म्हणजे कुतूहल टिकवून कालसुसंगत असणं. टी शर्ट- जीन्स घालून मॉडर्न होता येत नाही. काळाशी सुसंगत राहण्यासाठी बाहेरचा वारा आत येण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवणे पण वाऱ्याने त्या खिडक्या उडून जाणार नाहीत याची काळजी घेणे. आमच्या – वेळी – असं – नव्हतं हे चार शब्द आपल्या डिक्शनरीमधून फाडून टाकणे म्हणजे कालसुसंगत राहणे. बिमल रॉय, सलील चौधरी, हेमंत कुमार यांच्याबरोबर काम केलेले गुलज़ारसाहेब विशाल भारद्वाज, रेहमान, शंकर-एहसान-लॉय यांच्याबरोबर तितक्याच सहजतेने काम करताना दिसतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात. जग बदललं. लोकांच्या sensibilities बदलल्या. तरीसुद्धा ऐंशी उलटून गेल्यावरही स्वतःचा दर्जा जराही घसरू न देता गुलज़ारसाहेब लिहिते राहिलेत. आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी ना त्यांनी कधी जीन्स घातली ना त्यांना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याची गरज भासली. आधुनिक वाऱ्यांनी त्यांची पिंपळपाने सळसळत राहतात पण त्यांचा सोनेरी पिंपळवृक्ष आपली मुळे मातीत घट्ट पाय रोवून उभा आहे.

 

शेवटचं म्हणजे, आर्थिक स्वातंत्र्य. पैशाचा लोभ नव्हे, तर पैशावर प्रेम असणे. उत्तम जगण्यासाठी पैसा हवाच आहे. गुलज़ार साहेब फाळणीनंतर मुंबईत आले. खिशात पैसे नव्हते, पण स्वप्नं होती. लेखणीच्या आणि बुद्धीच्या बळावर एक कवी, लेखक, दिग्दर्शक पाली हिलमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो, याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय.

 

आपण सगळेच वयाने म्हातारे होण्याच्या मार्गावर आहोत.

Growing old is mandatory but getting old is optional, असं म्हणतात.

प्रत्येकाची आयुष्यं वेगवेगळी असतात. Circumstances वेगवेगळे असतात. त्यामुळे इच्छा असूनही काही लोकांच्या आयुष्याची इस्त्री बिघडतही असेल. पण बाकीच्यांनी आपलं म्हातारपण कडक इस्त्रीचं कसं राहील, याचा विचार आजपासूनच करायला काय हरकत आहे !

 

गुलज़ार, राकेश मेहरा आणि विशाल भारद्वाज अशा तिघांचा एक कार्यक्रम Youtube वर आहे. कार्यक्रमाचं नाव होतं:

कल आज और कल ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलज़ारसाहेब हातात माईक घेतात आणि म्हणतात, ‘कल आज और कल में ये दो कौन है पता नहीं, लेकिन वो ‘आज’ मै हूं !’

इस्त्री केलेल्या म्हातारपणाची इस्त्री कधीच मोडत नाही, ती अशी !

*एक अनामिक…*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *