मतदानाचे व्हिडीओ करून प्रसारीत करणे महागात पडले; तिन गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान करतांना त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून सोशल मिडीयावर प्रसारीत करणाऱ्या तिन जणांविरुध्द लोकप्रतिनिधी कायदा प्रमाणे तिन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य कर व्यवसाय निरिक्षक आणि निवडणुक एफएसटी पथक प्रमुख प्रकाश विठ्ठलराव कानिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती. या प्रसंगी मनबिरसिंघ ग्रंथी रा.गोवर्धनघाट यांनी मतदान केंद्रावर मतदान करतांना ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅडचे चलचित्रीकरण केले आणि ते सोशल मिडीयावर प्रसारीत केले. ही बाब 3 मे रोजी आमच्या निदर्शनास आली. या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 200/2024 दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 188 आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम 126(1), 126(ब) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मठपती हे तपास करीत आहेत.
दुसरा गुन्हा क्रमांक 201/2024 वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून त्याची तक्रारी सुध्दा प्रकाश कानिंदे यांनी दिलेली आहे. गोवर्धन घाट येथील सुरेश लोट याने मतदान प्रक्रियाच्या वेळी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग नांदेड येथे मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण करून तो सोशल मिडीयावर प्रसारीत केला. त्यामुळे आचार संहितेचा भंग झाला ही बाब 3 मे रोजी कळाल्यानंतर प्रकाश कानिंदे यांनी तक्रार केली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार डवरे अधिक तपास करीत आहेत.
तिसरा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाला असून त्याची तक्रार दिलीप व्यंकटराव उत्तरवार या एफएसटी पथकप्रमुखांनी दिली आहे. माजी नगरसेवक बालासाहेब दत्तराव देशमुख याने मतदान केंद्र क्रमांक 019, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पश्चिम बाजू तरोडा (बु) येथे मतदानाचे चित्रीकरण करून कॉंगे्रस पक्षाच्या चिन्हावर बटन दाबून मतदान करा असा प्रसार हे करीत होते. तो व्हिडीओ त्यांनी सोशल मिडीयावर सुध्दा प्रसारीत केला. विमानतळ पोलीसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 188 आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम 126(1), 126(ब) नुसार गुन्हा क्रमांक 136/2024 दाखल केला असून पोलीस अंमलदार ताटे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *