लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद

नांदेड,(जिमाका)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजीचे मतदान लक्षात घेऊन बुधवार 24 एप्रिल ते शुक्रवार 26 एप्रिलचे मतदान संपेपर्यत दारू विक्री बंद राहील. 48 तास दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अन्य मतदार संघातही 48 तासाची मद्यविक्री बंद राहील.

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक प्रक्रीया कार्यान्वित आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार हिंगोली लोकसभा -15 व नांदेड लोकसभा -16 साठी मतदान 26 एप्रिल 2024 रोजी तर मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. यावेळी निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इ. नियम 1969 च्या नियम 9 A (2) (C) (1) महाराष्ट्र देशी मद्य नियम 1973 च्या नियम 26 (1) (C) (1) तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने अनुज्ञप्ती देणे आणि ताडी झाडे छेदने नियम 1968 च्या नियम 5 (A) (1) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 142 (1) तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत.

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत असलेल्या ठिकाणी मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2024 रोजी मतदान संपेपर्यत, मतदानाचा दिवशी 26 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी 4 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. तसेच लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या तीनही बाजूला असलेल्या कार्यक्षेत्रात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी लोहा विधानसभा मतदार संघ क्षेत्रामधून नांदेड जिल्ह्यातील इतर क्षेत्रात मद्य अवैधरित्या वाहतूक, विक्री होण्याची शक्यता आहे. तसेच लोहा व कंधार तालुक्यातील ठराविक कार्यक्षेत्रात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होत आहे.

या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *