पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी साधला मतदारांशी संवाद 

नांदेड- लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने आज हादगाव तालुक्यातील तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाहिरी व पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर घालण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मिनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ह्या ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत. आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे मतदार न जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी नागरिकांशी संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाहीर गजानन जाधव यांनी सादर केलेल्या मतदान जागृती पोवाडा सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा जागर घातला.

जिल्हा परिषद हायस्कूल येथील सहाशे विद्यार्थी, शिक्षक व स्वीप टीमने यावेळी मी मतदान करणार याबाबत मतदानाची प्रतिज्ञा घेतली. हा संदेश शालेय विद्यार्थी आपापल्या घरी देणार आहेत.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी हदगाव पंचायत समिती येथे उपस्थित महिला बचत गटाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तामसा, येवली, पळसा, केदारगुडा या गावांना भेटी देऊन तेथील मतदान केंद्रांच्या सुविधांची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन केले. यावेळी गट विकास अधिकारी कैलास बळवंत, गट शिक्षणाधिकारी किशन फोले, बालविकास प्रकल्पाधिकारी उमेश मुदखडे, विस्तार अधिकारी रंजीत लोखंडे, तालुका समन्वयक गुणवंत चव्हाण, अमोल नवसागरे यांच्यासह केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *