जागतिक आरोग्य दिनानिमित्त मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

नांदेड,(जिमाका)- जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा केला जातो. यावर्षीचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य “माझे आरोग्य माझा अधिकार” हे आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, जनऔषध वैद्यशास्त्र विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. फॅमेली अॅडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत मार्कंड हे गाव वैद्यकीय महाविद्यालयाने दत्तक घेतलेले आहे. त्याअनुषंगाने येथे नियमित कुटुंब आरोग्य तपासणी करण्यात येते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. पी. एल. गट्टाणी तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. आर डी. गाडेकर, डॉ. आय. एफ. इनामदार डॉ. ज्योती भिसे प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिका अचमवाड, मुख्याध्यापिका सौ वंदना चव्हाण, ग्रामसेवक टि. एम. शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. गट्टाणी यांनी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपचार आणि निरोगी आरोग्य, आहार, तसेच वायुप्रदुषणामुळे होणारे आजार टाळण्यासाठी सामुहिकरित्या पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे महत्व पटवून दिले.

या आरोग्य शिबीरामध्ये जनऔषध वैद्यकशास्त्र, औषध वैद्यकशास्त्र, नेत्र शल्यचिकीत्साशास्त्र तसेच बालरोगशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबीरात 146 महिला, 107 पुरुष व 85 बालके असे एकूण 338 रुग्णाची तपासणी करुन त्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले व आवश्यकतेप्रमाणे काही रुग्णांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे संदर्भित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. फिरोज शेख तर आभार डॉ. संतोष जोगदंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सर्व निवासी डॉक्टर, समाजसेवा अधिक्षक गजानन वानखेडे, प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *