गांजा 27 किलो 50 ग्रॅम किंमत 1 लाख 35 हजार 250 रुपये
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने कंधार तालुक्यातील मौजे हाळदा शिवारात गांजाची शेती पकडली आहे. सापडलेल्या गांजाच्या झाडांचे वजन साडे सत्ताविस किलो आहे. या गांजाची एकुण किंमत 1 लाख 35 हजार 250 रुपये आहे. ही गांजाची शेती दोन वेगवेगळ्या गटांमध्ये होत होती.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 8 एप्रिल रोजी मौजे हाळदा शिवारात गट क्रमांक 675 मध्ये राजपत्रीत अधिकाऱ्यांसह प्रवेश केला. तेथे एकूण 13 गांजाची झाडे सापडली. त्यांचे वजन 8 किलो 700 ग्रॅम आहे. याची किंमत 43 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणी हाळदा येथील बजरंग नागोराव गुरपल्ले विरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 56/2024 दाखल करण्यात आला आहे. तसेच शेत गट क्रमांक 636 मध्ये सुध्दा पोलीसांनी छापा टाकला. तेथे गांजाची लहान मोठी अशी 34 लागवड केलेली झाडे सापडली. या गांजाचे वजन 18 किलो 350 ग्रॅम आहे. या गांजाची एकूण किंमत 91 हजार 750 रुपये आहे. उस्माननगर पोलीस ठाण्यात गट क्रमांक 636 मधील गांजाप्रकरणी गुन्हा क्रमांक 57/2024 दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही तक्रारी स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी दिल्या आहेत.
ही कार्यवाही केल्याप्रकरणी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, नायब तहसीलदार डी.जी. लोंढे, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार गाडेकर, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, गुंडेराव कर्ले, रुपेश दासरवाड, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, देविदास चव्हाण, मोतीराम पवार, बालाजी यादगिरवाड, शेख कलीम, बालाजी मुंडे यांचे कौतुक केले आहे.