शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही

जिल्हयात 144 कलम लागू ;आचारसंहितेचा कडक अवलंब

नांदेड :- भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश 16 मार्च 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.

 

लाऊडस्पीकर बंदी

ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सक्षम अधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावर ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी आणि रात्री. 10 वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश नांदेड जिल्ह्यासाठी 6 जून 2024 रोजीपर्यत अंमलात राहील.

विश्रामगृह वापरावर निर्बंध

कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध निवडणुुकीचे कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे याठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्याग्रह करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणणे,इत्यादी कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आले. हे आदेश नांदेड जिल्ह्यासाठी 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

परिसरात कालबद्ध निर्बंध

जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्त्यावरील वाहतुकीस प्रतिबंध निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय(जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड)येथे नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी उमेदवारांची गैरसोय व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यादृष्टीने नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मालपाणी बिल्डिंगपर्यत दिनांक 28 मार्च ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत शासकीय सुट्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यत केवळ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांच्या वाहनाच्या ताफ्यात तीन वाहने व शासकीय कर्तव्य पार पाडणारे शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे वाहने वगळता इतर सर्व वाहनास या रस्त्यावरुन वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या कालावधीत श्याम टॉकीज ते चिखलवाडीकडे जाणाऱ्या वाहनास शिवाजी महाराज यांच्या पुतळया समोरील पोस्ट ऑफीस व न्यायालय मधील मार्गाद्वारे चिखलवाडीकडे येणास पर्यायी मार्ग देण्यात आला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

शासकीय वाहनाचा गैरवापर नको

नांदेड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

संबंधित पक्षाचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर प्रतिबंध

संबंधित पक्षांचे चित्रे/चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

मालमत्तेची विरुपता नको

शासकीय, निमशासकीय,सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

 

शस्त्रास्त्रे वाहण्यास बंदी

शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर व शस्त्र बाळगण्यास बंदी निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे दिनांक 20 सप्टेंबर 2014 च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारके व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवाना दिलेली शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यास व शस्त्र बाळगण्यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

नामनिर्देशन पत्र दाखल करताना अवलंब करावयाची कार्यपद्धत

निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक‍ प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. तसेच वाहनाच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात आणण्यास, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

मतदान केंद्र परिसरात 144 कलम

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेदरम्यान, नांदेड जिल्ह्यात ज्याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्यास, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता 26 एप्रिल 2024 रोजी प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश मतदानाच्‍या दिवशी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यन्‍त अंमलात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *