किरण वाठोरे
नांदेड – देशात लोकसभा निवडणुकीची तयारी मोठ्या जोरात सुरू आहे. भाजपाने काही दिवसांपुर्वी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर काल दि. 13 मार्च रोजी महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांना भाजपची उमदेवारी जाहीर केली. ज्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना परत एकदा संधी देण्यात आली. यामुळे नव्याने भाजपवासी झालेल्या नेत्यांसह, कार्यकर्त्यांमध्ये कुठे आनंदी तर कुठे नाराजी पहावयास मिळत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते यावेळी 400 पारचा आकडा पार असे म्हणत आहेत. यामुळे देशात व राज्यात भाजप बऱ्याच नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेत आहे. नव्याने दाखल होणारे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याला उमेदवारी मिळेल, आपण सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत, आपण आपल्या भागाचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये सामील होत आहेत. परंतु नव्याने सामील झालेल्या पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांना आता ज्यांना उमेदवारी दिली, त्यांचे काम करावे लागणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदेडची बहुतांश राजकीय मंडळी ही भाजपमध्ये गेली. परंतु आता नांदेड जिल्ह्यासाठी भाजपने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नव्याने भरती झालेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकेकाळी अशोकराव चव्हाण यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे काम ईमानदारीने करावे लागणार आहे. या निवडणुकीतून खा. अशोकराव चव्हाण यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची परीक्षा देखील एकप्रकारे घेतली जाणार आहे. नव्याने भाजपवासी झालेले कार्यकर्ते आता किती ईमानदारीने भाजपच्या उमेदवाराचे काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात हे आता पाहण्यासारखे झाले आहे.