1 कोटी 20 लाखांचा मालक अवलिया; दररोज 600 रुपयांचा कचरा वेचतो

नांदेड(प्रतिनिधी)-अवलिया (संत) या शब्दाला त्या व्यक्तीच्या श्रध्देअनुरूप वापरले जाते. पण आज आम्ही सकाळी पाहिलेल्या एका व्यक्तीला त्याच्या कामानुरूप आम्ही अवलिया हा शब्द वापरू इच्छीतो. फक्त 1 कोटी 20 लाखांची संपती असणारा व्यक्ती दररोज सकाळी दुकानांसमोर फेकलेल्या प्लॅस्टीक बॅग जमा करतो आणि त्यातून दररोज 600 रुपये उत्पन्न मिळवतो. या व्यक्तीला अवलिया नाही तर काय म्हणायचे.
आज सकाळी 7 वाजेच्यासुमारास एका उघड्या हातरिक्षावर मोठ-मोठ्या बॅगा पाहिल्या. त्या बॅगांमध्ये कापड दुकानातील प्लॅस्टिक पिशव्या होत्या. या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये कापडे येतात त्यानंतर ग्राहक ते खरेदी करतात त्यानंतर प्लॅस्टिक पिशव्या कचऱ्यात फेकल्या जातात. या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला विचारणा केली की, प्लॅस्टीक तर गळत नाही तर तुम्ही प्लॅस्टीक जमा करून काय करणार? त्याने सांगितले ओळखण्याची दृष्टी हवी की, कोणते प्लॅस्टीक विरघळते आणि कोणते विरघळत नाही. कचऱ्यातून मी विरघळणारे प्लॅस्टीक जमा करतो आणि त्यातून दररोज 600 रुपये मिळतो. आपल्या दुकानासमोरचा कचरा काढला म्हणून काही दुकानदार सुध्दा 10 रुपये रोज मला देतात असे तो व्यक्ती सांगत होता. माझ्या रिक्षामध्ये मी कधीच साहित्य वाहतुक केली नाही.हे सांगतांना तो व्यक्ती सांगत होता की, मी माझ्या धरणी मायची सेवा करतो आणि तिच्यावरचा कचरा उचलून घेतो. त्यांच्या या शब्दाने आम्हालाही मनभरून आले. मग तर आम्ही गप्पांची वेळ वाढवली.
तो व्यक्ती सांगत होता माझे नाव सय्यद अनवर सय्यद अहेमद आहे. माझे वय 64 वर्ष आहे. मी गोवर्धनघाट टेकडी परिसरात घरकुलामध्ये राहतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करून त्यांच्यामुळेच मला घरकुल मिळाले असे सय्यद अनवर सांगत होते. मी सकाळी 5 ते 8 या वेळेदरम्यान हा प्लॅस्टीक बॅगांचा कचरा उचलतो आणि त्याची विक्री करतो. आम्ही विचारणा केली मुले काय करतात तर ते सांगत होते की, एक फर्निचर बनविण्याचे काम करतो आणि एक मटका बुक्की चालवतो. अचानकच त्यांच्या तोंडून निघाले की, माझ्याकडे संपत्ती किती आहे हे तर तुम्ही विचारलेच नाही तेंव्हा आम्ही विचारणा केली. त्यांनी सांगितलेला आकडा ऐकून आम्हालाच घेरी यायची वेळ आली. सय्यद अनवर सांगत होते की, एकूण 1 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती आहेे. गेली 20 वर्ष मी हेच काम करत आहे. मी कधीच माझ्या रिक्षात माल वाहतुक केेलेलीच नाही. सकाळी फक्त 3 तास काम करतो. त्यामुळे माझ्या शरिराला व्यायाम होता. माझ्या धरणी मायवर सांडलेला कचरा मी उचलून घेतो. त्यामुळे माझ्या जन्मभुमीची सेवापण करतो. हे सांगत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
आज सर्वत्र बेरोजगारीची ओरड होत आहे. सय्यद अनवर यांना काही माणसे दररोज दहा रुपये देतात पण ती पगार नव्हे. मग दररोज प्लॅस्टीकचा कचरा जमा करून तो कचरा 600 रुपयांमध्ये विकतो. तो अवलिया नव्हे तर कोण? कामाची कमतरता कोठेच नाही आपल्याला ते शोधता आले पाहिजे आणि प्रगती आपण स्वत: करायची असते यावर सय्यद अनवर यांना भेटल्यानंतर शिक्कामोर्तबच झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *