राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्ह्यात रविवारी आयोजन

नांदेड (जिमाका)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई  व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे रविवार 3 मार्च 2024 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबीक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व न्यायाधीश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती डी. एम. जज यांनी केले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्या योग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅंकांचे कर्ज वसुली प्रकरण, थकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आाहेत.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फी  रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही. अशाप्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो.  सर्व पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. सर्व संबंधित पक्षकारांनी रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा  लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *