नांदेड शहरात पोलीस वाहनांवर आठ महिला चालक

नांदेड(प्रतिनिधी)-वाहन चालविण्यामध्ये आता महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात आठ महिला पोलीस चालक नांदेड शहरात कार्यरत झाल्या आहेत. या महिला चालकांना भविष्यात आणखी प्रशिक्षण देवून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांवर सुध्दा चालक म्हणून देण्यात यावे म्हणजे फक्त शेवटच्या श्रेणीतील गाड्या चालविण्यापेक्षा पहिल्या श्रेणी गाड्या चालवायला सुध्दा संधी मिळेल.
भारतात महिलांनी विमान उडवले, रेल्वे चालवल्या, ट्रक चालविले, ऍटो रिक्षा चालवल्या, खाजगी चार चाकी वाहने चालविली. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रामध्ये महिलांच्या चालक या पदावर भरपूर कमी दावा होता. पण काही दिवसांपुर्वीच नांदेड जिल्हा पोलीस दलातील आठ महिलांनी आपले मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पुर्ण करून पुन्हा नांदेड येथे हजर झाल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड शहरातील वाहतुक शाखा क्रमांक 1 वजिराबाद येथे सुनिता सटवाजी क्षीरसागर बकल नंबर 1080 आणि अश्विनी शिवराम लाडकर बकल नंबर 1084 या दोघींना नियुक्ती दिली आहे. तसेच पोलीस ठाणे इतवारा दामिनी पथकात प्रतिभा यादव धोंडगे बकल नंबर 880 यांना नियुक्ती दिली आहे. अनिता रामदास ग्राहन बकल नंबर 115 वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. अर्चना कल्याण बाबर बकल नंबर 1598 यांना पोलीस ठाणे भाग्यनगर येथे नियुक्ती दिली आहे. मनिषा दादाराव चव्हाण बकल नंबर 943 यांना दामिनी पथक शहर या वाहनावर नियुक्ती दिली आहे. भाग्यश्री रघुनाथ माचनवाड बकल नंबर 1091 यांना पोलीस ठाणे इतवारा येथे नियुक्ती दिली आहे. अर्चना दिगंबर वानखेडे बकल नंबर 89 यांना पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
शहरात फिरणाऱ्या पोलीसांच्या या आठ वाहनांवर महिला अंमलदारांना नियुक्ती दिल्यामुळे शहरात सतत गस्त करतांना या महिलांना आपल्या जीवनातील एक वेगळाच अनुभव प्राप्त होणार आहे. सोबतच त्या स्वत: वाहन चालक झाल्याने वाहन चालकांना येणाऱ्या अडचणी बाबत त्यांना लवकरच कळेल. खरे तर साहेबांनी सांगितले तिकडे गाडी नेणे यापेक्षा चालकाचे दुसरे काही काम नसते. परंतू नांदेड शहरातील लोकांना दिसणारी ही नवीन परिस्थिती इतर महिलांना सुध्दा आपण सार्वजनिक वाहनावर वाहन चालक व्हावे यासाठी प्रेरणा नक्की देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *