नांदेड : उमरी तालुक्यातील गोरठा येथे संवेदनशील लेखिका कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौथे मराठी साहित्य संमेलन आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. वरदानंद प्रतिष्ठान श्रीक्षेत्र गोरठे तालुका उमरीच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित चौथ्या मराठी साहित्य संमेलनास साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
श्रीक्षेत्र गोरटे येथे आधुनिक महिपती संतकवी दासगुण यांची समाधी असून स्वामी वरादानंद भारती यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गोरटे येथे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय चौथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भाऊराव फुलारी साहित्य नगरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरटे येथे पार पडणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका ज्येष्ठ कवियत्री डॉक्टर वृषाली किन्हाळकर ह्या असणार आहेत तर संमेलनाचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता उद्घाटन समारंभ पार पडेल तर तत्पूर्वी सकाळी आठ वाजता सद्गुरु दासगणू महाराज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.
या संमेलनात काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार हां ये मुमकीन है या पुस्तकाच्या लेखिका डॉ. तरु जिंदल यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ . जिंदल यांनी बिहार च्या आदिवासी भागात चांगल्या वैद्यकीय सेवेसाठी संघर्ष केला तो अद्वितीय आहे. प्रफुल्ल कुलकर्णी डॉ रामेश्वर भाले आणि डॉ. माधव विभुते या त्रीसदसीय समितीनं डॉ तरू जिंदल यांची निवड केली आहे. प्रभाकर कानडखेडकर, शंतनु डोईफोडे , ॲड विजयकुमार भोपी , ॲड भाऊसाहेब देशमुख गोठेकर, मारुतराव कवळे गुरूजी , स्वरूपा सूर्यवंशी यांची संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत .
दुपारी बारा वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ” संत विचाराच्या अभावाने अराजकता वाढत आहे “या विषयावर गोविंद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या परिसंवादात प्रा .डॉ. मार्तंड कुलकर्णी, बाबाराव विश्वकर्मा हे सहभागी होणार आहेत . दुपारी दोन वाजता दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन सत्र पार पडणार असून यात प्रसिद्ध कथाकार राम तरटे, विलास ढवळे, धाराशिव शिराळे हे आपल्या कथा सादर करतील. जगन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता पार पडणाऱ्या कवी संमेलनात निवडक कवी आपल्या काव्यरचना ठेवणार आहेत.सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आनंदी विकास यांची संकल्पना निर्मिती आणि संगीत असलेला ” गोदेकाठी विठ्ठलमेळा” हा संगीतमय कार्यक्रम होईल. गोदेकाठी विठ्ठल मेळ्याचे निरूपण पद्माकर कुलकर्णी करणार असून विश्वास आंबेकर , धनंजय कंधारकर, सारिका गवारे हे आपल्या सुमधुर सुरांनी संगीतमय आणि भक्तीमय रचना सादर करतील. संवादिनी विकास देशमुख पखवाज अमोल लाकडे बासरी विठ्ठल चुनाळे आणि अमोल देशपांडे हे मंजिरी वाजवणार आहेत
गोरठा येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष शिरीष देशमुख गोरठेकर आणि संयोजक अशोक भाउराव फुलारी यांनी केले आहे.