डॉ. जनार्दन वाघमारे : शिक्षण आणि संस्कृती विषयावर मांडणार विचार

नांदेड (प्रतिनिधी) – थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व लातूर पॅटर्नचे शिल्पकार माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. जनार्दन वाघमारे प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन आज (शनिवारी) लातुरात करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत तथा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व्याख्यानाने गुंफले जाणार आहे.

उद्या, शनिवार, (दि २८ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता लातूर येथील जयक्रांती महाविद्यालयाच्या सभागृहात हे व्याख्यान होणार असून,च्या जनार्दन वाघमारे : शिक्षण आणि संस्कृती हा व्याख्यानाचा विषय आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंद घार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

साहित्य, समाजप्रबोधन, विवेकवादी विचार आणि चिकित्सक समीक्षेसाठी परिचित असलेले डॉ. सबनीस आपल्या परखड व स्वतंत्र विचारमांडणीसाठी ओळखले जातात. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाचा वेध घेतानाच समकालीन परिस्थितीत शिक्षण आणि संस्कृती यांच्यातील परस्परसंबंधांवर ते या व्याख्यानातून प्रकाश टाकणार आहेत.

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी शिक्षण, साहित्य, समाजचिंतन आणि लोकशिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. लातूरच्या शैक्षणिक आणि वैचारिक चळवळीला दिशा देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि खासदार म्हणून त्यांनी बजावलेली सार्वजनिक भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा नव्या पिढीला परिचय व्हावा, या उद्देशाने डॉ. जनार्दन वाघमारे प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षणप्रेमी, साहित्यिक, प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. जनार्दन वाघमारे प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, सिनेट सदस्य प्रा. डॉ अशोक मोटे, प्रा. सुधीर साळुंखे, डॉ. रमाकांत घाडगे, प्रा. डॉ. नारायण कांबळे, प्रा. डॉ. विनोद चव्हाण आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!