चालक-वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक! मुंबई – काल रात्री मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला व महाविद्यालयीन तरुणी चिंतेत होत्या. अशा परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी येथे पोहोचली. एसटी चालक आणि वाहकाने दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा आधार मिळाला. या कर्तव्यदक्षतेचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विशेष कौतुक केले. रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने उंबरमाळी स्थानकावर चाकरमानी, विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवासी अडकले होते. ही बाब लक्षात येताच कसारा येथे थांबलेल्या एसटी बसचे चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आगारात बसस्थानक प्रमुख यांना माहिती दिली. तसेच अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बस पाठविण्याची विनंती केली. बसस्थानक प्रमुख श्रीमती पूनम देशमुख यांनीही यास दुजोरा दिल्यानंतर लालपरी तातडीने उंबरमाळी स्थानकाकडे रवाना करण्यात आली. रात्रीच्या वेळी एसटी बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. बसमध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरदार महिलांची संख्या लक्षणीय होती. सुरक्षित प्रवासाची सोय झाल्याचे समजताच त्यांनी आपल्या पालकांना दूरध्वनी करून एसटी बस मदतीला आल्याची माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांचीही चिंता दूर झाली. प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे आभार मानले. त्यानंतर ही बस सर्व प्रवाशांना घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाली. या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक किरण खांडवी, वाहक राकेश पत्की आणि संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले. ‘एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत आहे,’ असे त्यांनी नमूद केले. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घेणे, हीच एसटीची खरी ओळख आहे. किरण खांडवी आणि राकेश पत्की यांनी आपल्या कृतीतून कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला आहे, अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. Kanthak Suryatal Post Views: 49 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत