विशेष पथकातील पोलीस कर्मचाऱ्याची दिवाळी गोड, हायव्याच्या पूजेने चर्चांना उधाण; मोदक प्रकरणाचीही पुन्हा आठवण! कंधार (प्रतिनिधी) – दिवाळीचा पाडवा म्हटला की सोने-चांदी, वाहन खरेदी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त! मात्र नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने पाडव्याच्या मुहूर्तावर चक्क हायवा खरेदी करून सोशल मीडियावर त्याच्या पूजेचा व्हिडीओ व्हायरल केला आणि मग काय, चर्चांच्या बाजारात एकच धुरळा उडाला. विशेष म्हणजे, हा हायवा खरेदी करणारे महाशय सर्वसामान्य पोलीस कर्मचारी नसून कंधार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकातील असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हायव्याच्या चाकांपेक्षा चर्चांची चाके अधिक वेगाने फिरू लागली आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलातील एकनाथ बालाजी घुले हे कंधार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मात्र त्यांची नियुक्ती कंधार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकात असल्याचे सांगितले जाते. दिवाळीच्या पाडव्याला त्यांनी नवीन हायवा खरेदी केला. त्यानंतर वाहनाची पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर झळकला. आता वाहनाची पूजा खासगी असली तरी व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर त्यावर चर्चा होणे हा सोशल मीडियाचा अलिखित नियमच आहे! घुले यांचे मूळ गाव संगमवाडी असून ते कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतच येते. कंधारवाडी येथे त्यांची शेतजमीन असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे परिसरात नातेवाईक, ओळखीचे आणि हितचिंतकांचा मोठा गोतावळा आहे. अशा परिस्थितीत हायव्याच्या पूजेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावापासून पोलीस वर्तुळापर्यंत चर्चांना उधाण येणे स्वाभाविकच! दरम्यान, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१९/२०२६ दाखल झाल्याची माहिती आहे. या गुन्ह्याच्या एफआयआरमधील तक्रारदाराने आपल्या जबाबात ‘एकनाथ’ असे नाव नमूद केल्याचे सांगितले जाते. मात्र आरोपींच्या यादीत एकनाथ हे नाव समाविष्ट नसल्याचेही समोर येते. त्यामुळे नावाचा उल्लेख नेमका कोणत्या संदर्भात आहे, याबाबत स्वतंत्र स्पष्टता आवश्यक आहे. नाव आले म्हणून आरोपी ठरविण्याची घाई करणे योग्य नाही; पण नावाचा उल्लेख झाला की चर्चांना मात्र आयते खाद्य मिळते! यापूर्वी एका कथित जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर तेथील मोदक गायब झाल्याची चर्चा रंगली होती. या संदर्भातील बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. आता मोदकांच्या चर्चेनंतर थेट हायव्याची एन्ट्री झाल्याने जुन्या चर्चांना नव्याने उजाळा मिळत आहे. अर्थात, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसताना केवळ चर्चांच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. खरे तर पोलीस कर्मचाऱ्याने हायवा खरेदी करू नये, असा कोणताही कायदा नाही. पोलीस कर्मचारी आहे म्हणून त्याने आयुष्यभर दुचाकीवरच फिरावे, असाही नियम नाही. त्याने मेहनतीच्या पैशातून हायवा घेतला असेल तर त्यात आक्षेप घेण्याचे कारण काय? आणि ती गाडी वाळू वाहतुकीसाठीच वापरली जाणार, असा संशय घेण्याचेही कारण नाही. कायद्याचे रक्षक असल्याने घुले यांना कायद्याची जाण नक्कीच असेल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही! शिवाय, हायवा त्यांच्या स्वतःच्या नावावर आहे की अन्य कोणाच्या नावावर, याचीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र पूजेचा व्हिडीओ त्यांनी व्हायरल केल्यामुळे गाडी त्यांचीच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता गाडी कोणाच्या नावावर, तिची किंमत किती आणि ती नेमकी कोणत्या व्यवसायासाठी वापरली जाणार, हे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. एकनाथ घुले यांनी ज्या खेळाच्या प्रमाणपत्रावर पोलीस नोकरी मिळवली त्या बाबत सुद्धा चौकशी सुरु होती पण त्यात काय झाले याचा थांगपत्ता सुद्धा लागत नाही. म्हणजे सर्व काही आलबेल झाले असेच म्हणावे लागेल. एकूणच, दिवाळीच्या पाडव्याला घुले यांच्यासाठी हायव्याचे पूजन शुभ ठरले की चर्चांचे ग्रहण लागले, हे सांगणे कठीण आहे. पण एक मात्र नक्की, हायवा रस्त्यावर धावण्याआधीच चर्चांच्या महामार्गावर धावू लागला आहे. उगीचच या चर्चांमुळे घुले यांचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अन्यायच म्हणावा लागेल! कारण हायवा खरेदी करणे हा गुन्हा नाही; मात्र पद, उत्पन्नाचे ज्ञात स्रोत आणि मालमत्ता याबाबत सार्वजनिक प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांची पारदर्शक उत्तरे देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेवटी प्रश्न हायवा खरेदीचा नाही, तर चर्चांना पूर्णविराम देणाऱ्या पारदर्शकतेचा आहे! Kanthak Suryatal Post Views: 879 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आई-वडिलांचं प्रेम अश्लील वाटणारं राजकारण: राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्ला की विकृत मानसिकतेचं प्रदर्शन? अवैध रेती वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा दणका; दोन हायवांसह ८०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त