उपलब्ध सिंचनाचे पाणी चारा पिकांसाठीच वापरा; नव्याने ऊस किंवा अधिक पाणी लागणाऱ्या तत्सम पिकांची लागवड टाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे शेतकऱ्यांना आवाहन नांदेड – अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन व जपून वापर करणे आवश्यक आहे. सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी प्राधान्याने चारा पिकांसाठी व सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांसाठीच वापरावे. नव्याने ऊस किंवा अधिक पाण्याची आवश्यकता असलेल्या तत्सम पिकांची लागवड टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. १५ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी उपलब्ध पाणीसाठा, सिंचनाची आवर्तने, पाणीपुरवठा आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील काही सिंचन प्रकल्पांमधून उपलब्ध पाणीसाठ्यानुसार सिंचनाची आवर्तने सुरू आहेत. या पाण्याचा वापर केवळ सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांसाठी करावा. सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी विहिरी, शेततळी किंवा अन्य खासगी पाणीसाठे भरण्यासाठी वापरू नये. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 178 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुष्काळात पशुधन संगोपनासाठी सगरोळीत विशेष कार्यशाळा शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवादातून खेत बचाओ अभियानाचा संदेश; मृदासंवर्धन आणि संतुलित खत वापरावर भर