तीन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून, भोकर येथे बारसमोरून ७५ हजार रुपयांची रोकड हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. तर नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि हदगाव येथे दोन घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या तिन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोकर येथे बारसमोर धुडगूस घालून रोकड हिसकावली भोकर येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेदरम्यान पाळज मदिरा बारसमोर ही घटना घडली. फिर्यादी योगिता साईनाथ अनमोड (वय २८, रा. पाळज, ता. भोकर) यांच्या फिर्यादीनुसार, पिराजी सायत्रा मनगनवार (वय ४३), लक्ष्मीबाई सायत्रा मनगनवार (वय ६०) आणि साईनाथ (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी उधारीवर बियर मागण्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच बारमधील गल्ल्यातील ७५ हजार रुपये काढून घेतले. बारमधील साहित्य आणि कारची तोडफोड करून ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५), ३०९(४), ३३२(सी), ३५१(१), ३०८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये घरफोडी; ९९ हजारांचा ऐवज लंपास विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्रकार सहवास कॉलनी येथे ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी प्रल्हाद गणपतराव उमाटे (वय ६४, रा. पत्रकार सहवास कॉलनी, नांदेड) यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगावमध्येही घरफोडी; ७५ हजारांचे दागिने चोरीला हदगाव येथील ग्रीन पार्क परिसरात १० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० ते १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पर्समध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी केशव विश्वनाथ माने (वय ३२, रा. ग्रीन पार्क, हदगाव) यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही घटनांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 223 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडून २ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास