नांदेड –  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या 1 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या ‘आरोग्य संवाद यात्रे’दरम्यान आरोग्य सेवांतील त्रुटी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या नाराजीची आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मंत्र्यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या सखोल चौकशीनंतर दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बदली, सेवा समाप्ती आणि कारणे दाखवा नोटीस अशा कठोर प्रशासकीय कारवाया करण्यात आल्या आहेत.

या आरोग्य संवाद यात्रेदरम्यान काही आरोग्य संस्थांमधील कामकाजाबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यासह संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार 3 नोव्हेंबर रोजी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यापूर्वी संचालक डॉ. कंदेवाड, उपसंचालक डॉ. सतीशकुमार सोळंके, आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्निल सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्या पथकाने संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली.

चौकशीअंती प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनखेड येथील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. लोहा येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यातील दुधड व काडली उपकेंद्रांतील दोन समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरील कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांची सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावरील पुढील कठोर प्रशासकीय कारवाई राज्यस्तरावरून करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्निल सांगळे यांनी दिली.

आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिला आहे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची प्राथमिक जबाबदारी असून, सेवांमधील दिरंगाई व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून आरोग्य प्रशासनाने दिला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!