• दिवाळी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद • जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानांतर्गत भव्य विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन; आज आणि उद्याही प्रदर्शन खुले • पारंपरिक फराळ, हस्तकला व ग्रामीण उत्पादनांचे स्टॉल; नागरिकांनी खरेदी करून महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे-मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील नांदेड – ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी मेहनतीने तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या परिसरात आयोजित तीन दिवसीय दिवाळी विक्री प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांकडून खरेदी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक परीक्षित यादव यांचीही यावेळी उपस्थिती होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महिला बचत गटांना स्टॉलच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू आणि विविध उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल, असे त्यांनी सांगितले. पारंपरिक दिवाळी फराळाची मेजवानी या प्रदर्शनात महिला बचत गटांनी घरगुती पद्धतीने तयार केलेले पारंपरिक दिवाळी फराळाचे विविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये चिवडा, चकल्या, बेसन लाडू, नाचणी लाडू, शेंगदाणा लाडू, शेव, शेवपापडी, भाकरवडी, पेढे आणि चिप्स यांचा समावेश आहे. भेसळमुक्त आणि दर्जेदार खाद्यपदार्थांना प्राधान्य देणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरत आहे. ग्रामीण उत्पादनांसह हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल खाद्यपदार्थांसोबतच गावरान डाळी, ज्वारी, तीळ, लोणची, हळद, मिरची पावडर, सोयाबीन पनीर, तूप, शेवया आणि विविध मसाल्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच आकाशकंदील, पणत्या, हस्तकला साहित्य, सौंदर्यप्रसाधने, पूजेचे साहित्य, धूप-अगरबत्ती आणि घोंगडी अशा विविध वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष आकर्षण म्हणून मोरिंगा पावडर आणि मोरिंगापासून तयार केलेले विविध पदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, मनरेगाचे अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक बालाप्रसाद जंगीलवाड आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या परिसरात आयोजित हे प्रदर्शन आज आणि उद्याही नागरिकांसाठी खुले राहणार आहे. नांदेड जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची खरेदी करावी. महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 149 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उदगीर विधानसभा प्रभारीपदी मुन्तजिबोद्दीन यांची निवड