१३ जणांवर गुन्हे दाखल; रोकड आणि ९ मोबाईलसह १ लाख २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धडक मोहीम राबवत मटका जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, २४ हजार २३० रुपयांची रोकड आणि नऊ मोबाईल असा एकूण १ लाख २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नांदेड परिक्षेत्रांतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक लातूर येथे कारवाईसाठी पाठवले होते. या पथकाने गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्केट यार्डच्या गेट क्रमांक ४ समोर, प्रिया टी हाऊसजवळील एका शटरमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ९ हजार २८० रुपयांची रोकड आणि ४६ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल जप्त करण्यात आले. एकूण ५५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरी कारवाई विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनसोडे नगर परिसरात करण्यात आली. येथील मोकळ्या जागेत मटका जुगार खेळविणाऱ्या तसेच खेळणाऱ्या व्यक्तींवर पथकाने कारवाई केली. घटनास्थळावरून १४ हजार ९५० रुपयांची रोकड आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ४४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १३ जणांविरुद्ध कारवाई करत २४ हजार २३० रुपयांची रोकड व नऊ मोबाईल जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकत्रित किंमत १ लाख २३० रुपये आहे. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाने केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. अवैध धंद्यांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ९१५०१००१०० हा या हेल्पलाइनचा मोबाईल क्रमांक असून, नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती या क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 70 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणूक आयुक्तांना मिळाली होती अभेद्य ढाल! पण सुप्रीम कोर्टाच्या एका नोटीसने उडाली खळबळ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!