नांदेड (प्रतिनिधी) – आजचा विद्यार्थी, उद्याचा शिक्षक’ या संकल्पनेतून पीपल्स कॉलेजमध्ये गुरुवारी कॉलेज डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक, उपप्राचार्य, सुपरवायझर तसेच प्राचार्यांच्या भूमिका साकारत एक दिवस महाविद्यालयाचे कामकाज अनुभवले. यावेळी शिवानी नळेगावे हिने प्राचार्याची भूमिका साकारत प्राचार्यांच्या खुर्चीवर विराजमान होत महाविद्यालयीन प्रशासनाची जबाबदारी अनुभवली. सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव तथा पीपल्स कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. प्रदीप नागापूरकर, उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे, प्राचार्याची भूमिका साकारणारी शिवानी नळेगावे, उपप्राचार्याची भूमिका साकारणारी समृद्धी गायकवाड, सुपरवायझर कृष्णा जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विशाल पतंगे यांनी शिक्षणाचे खरे स्वरूप विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे आवाहन केले. चार पुस्तके आणि चार भिंती यापलीकडेही शिक्षणाचे व्यापक विश्व आहे, याची जाणीव आज शिक्षकांची भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना झाली असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयात येणे, कट्ट्यावर किंवा बागेत बसणे म्हणजे शिक्षण नव्हे; काहीतरी शिकणे, ते आत्मसात करणे आणि आचरणात आणणे हेच खरे शिक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘चांगला विद्यार्थी हाच पुढे चांगला शिक्षक होऊ शकतो,’ असे सांगत डॉ. पतंगे यांनी शिक्षकांचे बोलणे मन लावून ऐकल्यास शिकवण्याच्या विविध पद्धती समजतात, असे नमूद केले. शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्येही स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे. आजच्या शिक्षण प्रक्रियेत मोबाईल हा मोठा अडथळा ठरत असून त्याचा किती आणि कसा वापर करायचा, हे विद्यार्थ्यांनी ठरवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ ग्रंथालय आणि पुस्तकांच्या सहवासात घालवावा. मोबाईलच्या युगातही शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी ‘टॉवर’ आहेत. चांगला विद्यार्थी घडला तर तो उद्याचा चांगला शिक्षक आणि चांगला माणूस म्हणून समाजात घडू शकतो, असे त्यांनी सांगितले. ॲड. प्रदीप नागापूरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील शिक्षक दिनाच्या आठवणींना उजाळा दिला. आपण विद्यार्थी असताना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मुख्याध्यापकाची भूमिका साकारली होती. भाषणासाठी उभे राहिल्यानंतर हात-पाय थरथरत असल्याची आठवण त्यांनी सांगितली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारणे हा केवळ उपक्रम नसून उद्याच्या समाजाची घडण करण्याची प्रक्रिया आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून आज शिक्षकाची भूमिका निभावताना शिक्षक होणे किती अवघड आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली असेल, असे ते म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी पीपल्स कॉलेजची स्थापना करून स्वातंत्र्यासाठी एक पिढी निर्माण केली. त्यांनी घालून दिलेला आदर्श आजही महाविद्यालयात जपला जात असून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि संस्कार देण्याचा त्यांचा संकल्प पुढे नेला जात असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. प्राचार्याची भूमिका साकारणाऱ्या शिवानी नळेगावे हिने प्राचार्य हे महाविद्यालयाचा कणा असल्याचे सांगितले. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांच्या हातात असते. प्राचार्य केवळ कार्यालयातील खुर्चीवर बसून काम करत नाहीत, तर संपूर्ण महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळतात, असे तिने आपल्या मनोगतात सांगितले. उपप्राचार्य समृद्धी गायकवाड, सेवक कृष्णा इंगोले, सुपरवायझर कृष्णा जाधव, सांची खंदाडे, श्रावणी कासेटवार, शैलेश गजभारे, मयुरी धर्मापुरे, वीरा जोंधळे, कोमल वाठोरे, कीर्ती वावळे आणि प्रांजली जवळेकर यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकाची भूमिका साकारतानाचे अनुभव व्यक्त केले. शिक्षक होणे सोपे नसते; त्यासाठी शिकवण्याची तयारी, वर्गावर नियंत्रण आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आई-वडील जन्म देतात; मात्र शिक्षक भविष्य घडवतात, असे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुरुवातीला भूमिका साकारताना भीती वाटत होती; त्यासाठी मोठी तयारी करावी लागली. मात्र शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याने सहभागी होता आले आणि उपक्रमानंतर आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. भविष्यात कोणत्याही पदावर काम करताना या अनुभवाचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले. आई-वडिलांप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांना संस्कार देतात आणि अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळावी, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली जवळेकर हिने केले, तर ऋतुजा नीलावर हिने आभार मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 76 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीम विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचा गौरव