राष्ट्रीय पुरस्कारापासून ‘भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार २०२६’ पर्यंत पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांच्या स्वरप्रवासाचा घेतलेला वेध

काही आवाज कानावर पडतात आणि थोड्या वेळासाठी थांबतात. काही आवाज मात्र मनात कायमचे राहतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांचा स्वर हा दुसऱ्या प्रकारात मोडतो. त्यांच्या आवाजातील मधुरता, भाव व्यक्त करण्याची ताकद आणि प्रत्येक गाण्यात जाणवणारी खरी भावना यामुळे त्यांनी मराठी संगीतविश्वात वेगळे आणि घट्ट स्थान मिळवले आहे. नुकतेच त्यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार २०२६’ मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या सततच्या मेहनतीचा आणि संगीत प्रवासाचा मोठा सन्मान आहे.

सावनी रवींद्र यांचा जन्म २२ जुलै १९८९ रोजी एका समृद्ध संगीतपरिवारात झाला. त्यांना संगीताचा वारसा रक्तातूनच मिळाला होता. वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे शास्त्रीय गायक आणि गायक-अभिनेते होते. आई वंदना घांगुर्डे मराठी संगीत नाटकांतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावनीच्या बालपणापासूनच सुरांची पायाभरणी झाली.

वडिल डॉ. रवींद्र घांगुर्डे यांच्याकडून त्यांना विविध रागरागिण्यांची ओळख झाली. दुसरीकडे नाट्यसंगीत आणि सुगम संगीताचे संस्कारही घरातूनच मिळाले. वारसा मिळाला म्हणून कोणी कलाकार होत नाही. त्यासाठी लागणारी तपश्चर्या आणि जिद्द सावनी यांनी लहानपणापासूनच अंगीकारली. वयाच्या फक्त ८ व्या वर्षापासून त्यांनी सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पं. यशवंत देव यांच्याकडून मराठी सुगम संगीत शिकायला सुरुवात केली. यशवंत देव यांच्यासारख्या अनुभवी गुरूंचे मार्गदर्शन मिळणे हा त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा काळ ठरला.

नादब्रह्म परिवाराने आयोजित केलेल्या यशवंत देव यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारप्रसंगी ‘देवगाणी’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या उपस्थितीत सावनी यांना गाण्याची संधी मिळाली. त्यांच्या त्या सुरेल गायनाने उपस्थिताचे मन जिंकले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी पाठवलेल्या महाराष्ट्राच्या विशेष संघात सावनी यांची निवड झाली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसमोर यशवंत देवांनी लिहिलेले गीत गाण्याचा तो क्षण त्यांच्या आयुष्यातील खूपच प्रेरणादायक टप्पा ठरला.

यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. रवि दाते यांच्याकडे गझल गायकीचे आणि पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत त्यांनी आपल्या सुरांना अधिक सखोल केले. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकताना महाविद्यालयाच्या वतीने युरोपमध्ये गेलेल्या निवडक प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या चमूतही त्या सहभागी होत्या.

आज रंगमंच, पार्श्वगायन आणि घराघरात पोहोचलेला स्वर अशी त्याची ओळख आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया असलेल्या सावनी यांनी स्वतःला एका चौकटीत अडकवले नाही. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत, गझल या विविध संगीतप्रकारांचा त्यांनी यशस्वीपणे अभ्यास केला. ‘गझल का सफर’, ‘ब्लॅक अँड व्हाईट’ आणि ‘गुलझार – बात पश्मिने की’ या प्रसिद्ध कार्यक्रमांचे त्यांनी देशात आणि परदेशात प्रयोग केले. यात अमेरिका, लंडन, दुबई, अबू धाबी या ठिकाणांचा समावेश आहे.

‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘ती रात्र’, ‘मानसन्मान’, ‘दांडगी मुलं’ आणि ‘पाच नार एक बेजार’ या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले पार्श्वगायन खास लोकप्रिय झाले.

झी मराठीवरील लोकप्रिय ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील “तू मला, मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो…” हे गाणे घराघरात ऐकू येऊ लागले. या गाण्यामुळे ते महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पोहोचले.

‘आशाएं’ (हिंदी), ‘अजूनही’ आणि ‘कॅनव्हास’ (मराठी) हे त्यांचे अल्बम रसिकांना खूप आवडले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ कार्यक्रमात सहगायिका म्हणून गाण्याची संधी मिळाली. ही गोष्ट त्यांच्यासाठी मोठा सन्मान होती.

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त हा पुरस्कार स्वीकारताना सावनी खूप भावूक झाल्या. या अगोदर मिळालेला राष्ट्रीय पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कारांनी (शाहू मोडक पुरस्कार, मोरया गोसावी पुरस्कार, रतिलाल भावसार पुरस्कार) सावनी रवींद्र यांचा सन्मान झाला आहे.

“मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मिळालेला हा ‘भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार’ माझ्यासाठी केवळ सन्मान नाही. माझ्या संपूर्ण संगीतप्रवासाला लाभलेला हा सर्वोत्तम आशीर्वाद आहे,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा बहुमान त्यांनी आपले आई-वडील आणि सर्व गुरुजनांना समर्पित केला.

राष्ट्रीय सन्मान आणि लतादीदींच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यानंतरही कलाकार थांबत नाही. तो नवीन वाटा शोधतो. याच ध्येयाने प्रेरित होऊन, सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आल्या आहेत. त्यांनी स्वतःचे ‘म्युझिक लेबल’ सुरू केले आहे आणि स्वतंत्र संगीतनिर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

संगीताचा वारसा हा त्यांच्या प्रवासाचा केवळ आरंभबिंदू होता. पण त्यांच्या कठोर साधनेने, गुरूंच्या संस्कारांनी आणि प्रत्येक सुराला न्याय देण्याच्या जिद्दीने त्या वारसाचे रूपांतर एका स्वतंत्र ओळखीत केले आहे.

सावनी रवींद्र यांच्या या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना एकच सत्य प्रकर्षाने जाणवते. वारसा मिळाला होता, पण त्या वारशाला आपल्या स्वतःच्या सुरेल स्वरांनी खरी ओळख मिळवून देण्याचे काम सावनी यांनी आपल्या अखंड साधनेने केले आहे.

️ – राहूल हरीभाऊ इंगळे पाटील – मोबाईल ९८९०५७७१२८ 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!