वाशिम (प्रतिनिधी) – वाशिम शहरात बंद घरांची कुलूपे तोडून धुमाकूळ घालणारा कुख्यात घरफोडी करणारा रॅन्डो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अत्यंत शिताफीने कारवाई करत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनांचा यशस्वी उलगडा केला असून आरोपीकडून ११ लाख ५ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिव्हिल लाईन परिसरातील चोरीची घटना ५ जानेवारी २०२५ रोजी सिव्हिल लाईन परिसरातील इरिगेशन कॉलनीतील रहिवासी सिताराम सखाराम वाशिमकर (वय ६५) आणि योजना पार्क येथील रहिवासी अरुण रामराव सरनाईक (वय ५९) यांच्या बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मेहकर हद्दीतून संशयिताला अटक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे निर्देश दिले होते. एलसीबीच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पुसद येथील सराईत चोरटा रॅन्डो उर्फ फिरोज खान साहेब खान (वय ३६, रा. मुखरी चौक, तुकाराम बापू वार्ड, पुसद, जि. यवतमाळ) याचे नाव निष्पन्न केले. एलसीबीने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही घरफोड्यांची कबुली दिली. आरोपीकडून ७ तोळे सोन्याची लगड आणि ९ तोळे चांदीची लगड असा एकूण ११ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. गुन्हे उकलीत वाशिम पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी गेल्या तीन महिन्यांत विविध गुन्ह्यांचा उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात वाशिम पोलिसांचा आलेख कमालीचा वाढला आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे जिल्ह्यात गुन्हे उकल होण्याचे प्रमाण वाढले असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेवर टाकलेला विश्वास पोलीस निरीक्षक सुधाकर आढे आणि त्यांच्या पथकाने सार्थ ठरवला आहे. तपास पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, शेखर मास्कर, पोलीस अंमलदार गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, भूषण ठाकरे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, अविनाश वाढे, संतोष वाघ, शाम इंगळे, सुनील तायडे तसेच अंगुली मुद्रा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष भोंडे, संदीप सरोदे, महेश आकरे, शीतल मानकर आणि गणेश ब्रिंगल यांनी पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 116 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये १.०३ लाखांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; फतेहबुरुज परिसरातील आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल